शासनकर्त्यांनी शिवरायांच्या शासनव्यवस्थेला समजून घ्यावे : भय्याजी जोशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 12:50 AM2020-06-05T00:50:04+5:302020-06-05T00:52:23+5:30
आजच्या शासनकर्त्यांनी शिवरायांच्या शासनव्यवस्थेला समजून त्याचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात सुमारे ३०० किल्ले होते. त्यापैकी केवळ नातेवाईक म्हणून त्यांनी कुणाला किल्लेदार बनवले नाही. शासनव्यवस्थेत नात्यापेक्षा व्यक्तीच्या गुणांना जास्त महत्त्व दिले. आजच्या राजकारणातदेखील त्यांचे ते वर्तन दिशा दाखविणारे आहे. कुठल्याही राजाने सजग कसे राहायला हवे, याचा आदर्श त्यांनी मांडला. एक राजा म्हणून त्यांनी राज्यकारभाराची ब्ल्यू प्रिंटच जगासमोर ठेवली. नारे, भाषणातून नव्हे तर आदर्श व्यवहारातून आस्था जागृत होते. आजच्या शासनकर्त्यांनी शिवरायांच्या शासनव्यवस्थेला समजून त्याचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकदिनानिमित्त हिंदू साम्राज्य दिनोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी त्यांनी ऑनलाईन उद्बोधन केले.
शिवाजी महाराजांच्या जीवनात अनेक संघर्षाचे प्रसंग आले. त्यांनी आपल्या शौर्याचा उपयोग देशहितासाठीच केला. कोणत्याही नेतृत्वाच्या यशस्वीतेचे काही टप्पे असतात. त्याचे सुरुवातीचे जीवन कसे राहिले, परिस्थितीचे आकलन करण्याची क्षमता, आस्था व श्रद्धेचे विषय या गोष्टी यात महत्त्वाचे असतात.
शिवाजी महाराज धर्मासाठी लढले व देशासाठी जगले. शिवरायांच्या मनात कधीच व्यक्तिगत स्वार्थ नव्हता. केवळ स्वराज्य सुरक्षित राहण्याची अपेक्षा होती. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना केली, परंतु त्यांना स्वत: राजा बनायचे नव्हते. जनता व मार्गदर्शकांच्या आग्रहापोटी त्यांनी होकार दिला होता. आस्था वाढते तेव्हा विश्वास निर्माण होतो. असाच विश्वास महाराजांबाबत कोट्यवधी जनतेच्या मनात आहे. स्वराज्यात शिस्त होती व भेदभाव नव्हता. कोणतेही लक्ष्य प्राप्त करायचे असेल तर निर्भयपणे समोर मार्गक्रमण केले पाहिजे, हीच शिकवण शिवरायांनी नेहमी दिली, असे भय्याजी जोशी म्हणाले.
शिवाजी महाराजांनी जनतेचा विश्वास प्राप्त केला होता. सामान्य जनतेमध्ये अविश्वास राहिला तर कोणताही राजा समाजाला पुढे नेऊ शकत नाही, याची त्यांना जाण होती. त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन समाजाने परत एकदा आत्मविश्वासाने उभे राहावे व आसुरी शक्तींचा हिमतीने सामना करावा, असे आवाहन भय्याजी जोशी यांनी केले.