उंदीर पकडण्यासाठी आली पुण्याची चमू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 09:02 PM2018-09-11T21:02:34+5:302018-09-11T23:07:53+5:30
स्क्रब टायफसच्या रुग्णांची संख्या १०० वर पोहचली आहे. या रोगाला कारणीभूत असलेले ‘चिगर माईट्स’ मिळविण्यास आरोग्य विभागाला अद्यापही यश आले नाही. यामुळे आता पुण्याच्या कीटकशास्त्रज्ञ चमूची मदत घेण्यात आली असून मंगळवारी या चमूने काटोल, नरखेड भागातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांना उंदीर पकडण्याचे ‘रॅट ट्रॅप’ लावण्याचे प्रशिक्षण दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्क्रब टायफसच्या रुग्णांची संख्या १०० वर पोहचली आहे. या रोगाला कारणीभूत असलेले ‘चिगर माईट्स’ मिळविण्यास आरोग्य विभागाला अद्यापही यश आले नाही. यामुळे आता पुण्याच्या कीटकशास्त्रज्ञ चमूची मदत घेण्यात आली असून मंगळवारी या चमूने काटोल, नरखेड भागातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांना उंदीर पकडण्याचे ‘रॅट ट्रॅप’ लावण्याचे प्रशिक्षण दिले.
उंदरांच्या त्वचेला घट्ट चिकटून असणारा स्क्रब टायफसचा जीवाणू ‘चिगर माईट्स’मुळे हा रोग होत असल्याचे समोर आले आहे. या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी हा जीवाणू शोधून त्यावर अभ्यास करणे आवश्यक आहे. यासाठी गेल्या काही दिवसांपासून ‘चिगर माईट्स’ मिळविण्याचा प्रयत्न होत आहे. परंतु आरोग्य विभागासोबतच नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयाला यश आले नाही. याची दखल घेत पुण्याच्या सहसंचालक आरोग्य विभागाच्या हिवताप व हत्तीरोग विभागातील कीटकशास्त्रज्ञ चमूला पाचारण करण्यात आले. त्यानुसार सोमवारपासून ते नागपुरात दाखल झाले आहेत. मंगळवारी त्यांनी नरखेड, काटोल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना ‘रॅट ट्रॅप’ लावण्याचे प्रशिक्षण दिले.
‘लोकमत’शी बोलताना कीटकशास्त्रज्ञ मुकुंद देशपांडे म्हणाले, घराघरात आढळून येणारा उंदीर आणि शेतात, जंगलात आढळून येणाºया उंदरांमध्ये फरक असतो. स्क्रब टायफस हा आजार शेतात आढळून येणाºया ‘टटेरा इंडिका’ या भुºया रंगाच्या उंदराच्या शरीरावर पोसल्या जाणाºया ‘चिगर माईट्स’मुळे होत असावा, अशी शक्यता आहे. यामुळे या रोगाचे ‘पॉझिटीव्ह’ आलेल्या रुग्णांचा इतिहास घेऊन शेत जमीन व गवताळ भागातील उंदराच्या बिळाच्या तोंडावर, आडोशाला व इतरही ठिकाणी ‘रॅट ट्रॅप’ लावण्याचे प्रशिक्षण कर्मचाºयांना दिले. पकडण्यात येणारे हे उंदीर नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात येतील. तिथे त्यांच्या अंगावर चिकटून असलेले ‘चिगर माईट्स’ काढून त्यावर अभ्यास केला जाईल. उंदरामुळे ‘स्क्रब टायफस’ पसरतो हे म्हणणे योग्य असले तरी उंदीर मारणे हा त्यावर उपाय नाही. उंदीर मारणे सुरू झाले तर त्याच्या रक्तावर पोसणारा हा जीवाणू लोकांमध्ये वेगाने पसरून, धोका वाढू शकतो.