कोरोनामुळे नागपुरात कुलर वापरण्यास बंदीची अफवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 10:32 AM2020-04-22T10:32:10+5:302020-04-22T10:33:14+5:30

कोरोनाचा फैलाव होण्याच्या कारणामुळे महानगरपालिकेने कुलर वापरण्यावर बंदी आणल्याची अफवा पसरविण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. कारवाईच्या भीतीमुळे अनेकांनी आपापल्या घरचे कुलर काढले आहेत.

Rumors of ban on cooler use in Nagpur due to corona | कोरोनामुळे नागपुरात कुलर वापरण्यास बंदीची अफवा

कोरोनामुळे नागपुरात कुलर वापरण्यास बंदीची अफवा

Next
ठळक मुद्दे कारवाईच्या भीतीमुळे अनेकांनी काढले कुलरनागरिकांमध्ये दहशत

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा फैलाव होण्याच्या कारणामुळे महानगरपालिकेने कुलर वापरण्यावर बंदी आणल्याची अफवा पसरविण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. कारवाईच्या भीतीमुळे अनेकांनी आपापल्या घरचे कुलर काढले आहेत.
मनपाचे पथक शहरात फिरून कुलर बंद करण्याचे आवाहन करीत आहे. त्यांना कुलरच्या टाकीत पाणी आढळून आल्यास कुलर जप्त केला जाणार आहे. तसेच, कायदेशीर कारवाई केली जाणार आहे अशी अफवा शहरात पसरविण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे शहरात आधीच तणाव आहे. त्यात ही अफवा भर टाकत आहे. उत्तर नागपुरातील पिवळी नदी, राजीवनगर, संघर्षनगर, योगी अरविंदनगर, पांडे वस्ती, वांजरा, मध्य नागपुरातील मोमीनपुरा, कब्रस्तान रोड, भानखेडा, अन्सारनगर, सैफीनगर, डोबीनगर, बोरियापुरा, तकिया, पूर्व नागपुरातील शांतिनगर, हसनबाग, ताजाबाद या भागात ही अफवा घरोघरी पोहचली आहे.

कुलर वापरण्यावरील बंदीची बाब अफवा असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. कोरोनामुळे एसी व कुलर वापरण्यासह थंड पेय आणि थंड पदार्थ सेवनासंदर्भात नागरिकांमध्ये संभ्रम आहे. या गोष्टींमुळे कोरोना वाढतो असा समज आहे. परंतु, शहरातील सरकारी व खासगी रुग्णालयांतील डॉक्टरांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, या गोष्टींचा कोरोना प्रसारासोबत प्रत्यक्ष संबंध नाही, पण सावधगिरी म्हणून या गोष्टींचा उपयोग टाळणे चांगले आहे. या गोष्टींमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन ताप, खोकला, सर्दी ही लक्षणे असलेले आजार होऊ शकतात. कोरोनामध्येदेखील हीच लक्षणे दिसून येतात. त्यामुळे या गोष्टींपासून दूर राहणे चांगले आहे.
अफवा पसरविणाऱ्यावर कारवाई होईल

मनपा प्रशासनाने कुलर, एसीच्या वापरावर बंदी आणली नाही. तसेच, यासंदर्भात कोणती घोषणाही केली जाणार नाही. त्यामुळे याविषयी कुणी अफवा पसरविताना आढळून आल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल.
- अशोक पाटील, सहायक आयुक्त, मनपा.

 

Web Title: Rumors of ban on cooler use in Nagpur due to corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.