नागपुरात ओलसर नोटा सापडल्याने अफवा पसरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 11:05 PM2020-04-16T23:05:12+5:302020-04-16T23:06:10+5:30
वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका भागात ओल्या नोटा फेकल्याच्या अफवेमुळे काही काळ खळबळ निर्माण झाली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका भागात ओल्या नोटा फेकल्याच्या अफवेमुळे काही काळ खळबळ निर्माण झाली होती.
वाठोडा पोलिसांनी धावपळ करून घटनास्थळ गाठले तेथे दहाच्या पाच ते सात नोटा पोलिसांना आढळल्या एखाद्याच्या खिशातून त्या पडल्या असाव्यात आणि हवेमुळे बाजूला गेल्या असाव्यात, असा पोलिसांचा अंदाज आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील योगेश्वरी नगरात माऊली किराणा स्टोअर्सजवळ रस्त्याच्या कडेला दहा रुपयांच्या पाच ते सात नोटा पडून दिसल्या.
त्या ओलसर असल्यामुळे बघणाऱ्यांनी उलटसुलट अंदाज बांधले आणि त्यामुळे परिसरात ओलसर नोटा फेकल्याची अफवा पसरली. त्यामुळे नागरिकांनी तिकडे धाव घेतली. माहिती मिळताच वाठोडा पोलिसांचे पथकही तेथे पोहोचले. घटनास्थळी पोलिसांना दहा दहाच्या सात नोटा आढळल्या. पोलिसांनी त्यांची पाहणी केली असता त्या काहीशा ओलसर होत्या. पोलिसांकडे विचारणा केली असता, एखाद्याच्या खिशातून चालत्या गाडीवरून या नोटा पडल्या असाव्यात आणि हवेमुळे त्या रस्त्याच्या कडेला उडाल्या असाव्यात, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.