‘रन फॉर इक्वॅलिटी’, जिल्हा प्रशासनातर्फे रविवारी महिला मॅरेथॉनचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2022 06:07 PM2022-03-11T18:07:57+5:302022-03-11T18:11:45+5:30
संविधान चौकातून सकाळी ७ वाजता या मॅरेथॉनला सुरुवात होईल व त्यात पुरुषांना सहभागी होता येणार नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आंतरराष्ट्रीय महिला दिवसानिमित्त जिल्हा प्रशासनातर्फे महिलांसाठी ‘रन फॉर इक्वॅलिटी’या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. संविधान चौकातून सकाळी ७ वाजता या मॅरेथॉनला सुरुवात होईल व त्यात पुरुषांना सहभागी होता येणार नाही.
५ किमी मॅरेथॉनची सुरुवात संविधान चौकापासून होईल आणि विधानभवन, जपानी गार्डन, वॉकर्स स्ट्रीट, रामगिरी, पोलीस जिमखाना आणि व्हीसीए स्क्वेअरमार्गे कस्तूरचंद पार्क येथे समाप्त होईल.
महिलांना एकत्र येण्याची आणि सक्षम होण्याची संधी देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय समाजात नेहमीच महिलांवर वर्चस्व गाजविण्यात आले आहे. त्यांच्यावर सर्व बंधने घालण्यात आली आहेत. कोणताही पालक मुलाला काही करण्यास मनाई करत नाही. एकता ही शक्ती आहे हा संदेश आम्हाला द्यायचा आहे, असे जिल्हाधिकारी आर.विमला यांनी सांगितले.
२ किलोमीटरची मॅरेथॉन ही आईमुलीच्या जोडीसाठी आहे. इयत्ता ८, ९ आणि ११ वी चे विद्यार्थी त्यांच्या मातांसह सहभागी होऊ शकतात. ३ आणि ५ किमीची मॅरेथॉन इतर महिलांसाठी आहेत. जिल्हा प्रशासन विजेत्याला स्कूटी देईल तर इतरांना २ हजार ते ४० हजारापर्यंतची रोख बक्षिसे देण्यात येतील.
मॅरेथॉनच्या माध्यमातून शासकीय योजनांची जनजागृती करण्याचीदेखील जिल्हाधिकाऱ्यांची योजना आहे. एड्स, क्षयरोग इत्यादींच्या रुग्णांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अनेक योजना आहेत. दुर्दैवाने, अनेकांना त्याबद्दल माहिती नाही. या योजनांबद्दल जनजागृती करण्यासाठी आरोग्य कर्मचारी मार्गावर फलक घेऊन उभे राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
मॅरेथॉनमधून वाहतुकीच्या नियमांबद्दल जागरूकता निर्माण करण्यात येईल. हेल्मेंट आणि सीट बेल्ट घाला, वेग वाढवू नका आणि ट्रॅफिक सिग्नल तोडू नका याचा संदेश देण्यात येईल. सुमारे ५० हजार महिला यात सहभागी होतील. संख्या महत्त्वाची नाही तर मुळात महिलांना स्वातंत्र्य अनुभवण्याची संधी देणे हे जास्त गरजेचे आहे, असे त्या म्हणाल्या. जिल्हा प्रशासनातर्फे मॅरेथॉनच्या नोंदणीसाठी https://forms.gle/aj4DTYYMDhuoULwa6 ही लिंक जारी करण्यात आली आहे.