त्रस्त नवरोबाचा नागपूरच्या कौटुंबिक न्यायालयात हैदोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 09:54 PM2018-01-23T21:54:48+5:302018-01-23T21:56:15+5:30
कौटुंबिक भांडणामुळे त्रस्त नवरोबाने मंगळवारी कुटुंब न्यायालयात प्रचंड हैदोस घातला. त्याने न्यायाधीश पलक जमादार यांच्या आसनावर फायबरची खुर्ची फेकून मारली तसेच जोरजोराने आरडाओरड करून परिसरातील शांतता भंग केली. या गोंधळामुळे काही काळाकरिता भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कौटुंबिक भांडणामुळे त्रस्त नवरोबाने मंगळवारी कुटुंब न्यायालयात प्रचंड हैदोस घातला. त्याने न्यायाधीश पलक जमादार यांच्या आसनावर फायबरची खुर्ची फेकून मारली तसेच जोरजोराने आरडाओरड करून परिसरातील शांतता भंग केली. या गोंधळामुळे काही काळाकरिता भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
कृष्णा सुंदरलाल श्रीवास (३५) असे संबंधित व्यक्तीचे नाव असून, तो गणेशपेठ येथील रहिवासी आहे. त्याने २०१५ मध्ये कुटुंब न्यायालयात घटस्फोटासाठी याचिका दाखल केली असून, ती याचिका प्रलंबित आहे. त्या याचिकेवर मंगळवारी न्यायाधीश पलक जमादार यांच्यासमक्ष सुनावणी होती. त्यासाठी तो न्यायालयात आला होता. कुटुंब न्यायालय वकील संघटनेचे उपाध्यक्ष व प्रत्यक्षदर्शी अॅड. श्याम अंभोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी १.३० च्या सुमारास श्रीवास आरडाओरड करीत न्यायालयात आला.
प्रवेशद्वारावरील पोलिसांना हुलकावणी देऊन तो थेट पहिल्या माळ्यावर चढला. दरम्यान, त्याने पक्षकारांना न्यायालय प्रकरणांची माहिती देणाऱ्या संगणकावर हेल्मेट आदळले. तेथून पुढे येऊन त्याने बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अॅन्ड गोवाच्या कार्यालयाची फायबरची खुर्ची पहिल्या माळ्यावरून खाली फेकली. त्यामुळे खुर्ची तुटून निकामी झाली व खाली उभ्या वाहनांचे काही प्रमाणात नुकसान झाले. त्यानंतर तो ओरडत न्या. जमादार यांच्या न्यायालयात गेला. त्याने तेथील फायबरची खुर्ची उचलून ताकदीने न्यायासनावर फेकली. त्यामुळे न्यायाधीशांची वजनी लाकडी खुर्चीही मागे पलटली व आसनावरील काच फुटला. ती मधल्या सुटीची वेळ असल्यामुळे न्या. जमादार चेंबरमध्ये बसून होत्या. परिणामी, मोठा अनर्थ टळला.
श्रीवासला ताब्यात घेण्यात न्यायालयातील पोलिसांनी विलंब केला. त्यामुळे त्याने एवढ्या गंभीर स्वरूपाचा हैदोस घातला. न्यायासनावर खुर्ची फेकेपर्यंत कुणीही धावून त्याला पकडले नाही. त्याने हा हैदोस घालण्यामागे विविध कारणे सांगितली जात आहेत. श्रीवासला न्या. जमादार यांच्या न्यायालयात पकडून सीताबर्डी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
कडक सुरक्षा नाही
बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अॅन्ड गोवाचे माजी उपाध्यक्ष अॅड. अनिल गोवारदीपे यांनी कुटुंब न्यायालयात कडक सुरक्षा व्यवस्था नसल्याची माहिती दिली. ढिसाळ सुरक्षा व्यवस्थेमुळे न्यायालयात कधीही गंभीर घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मंगळवारची घटना त्याचाच पुरावा असल्याचे त्यांनी पुढे बोलताना सांगितले.