आठवडाभरात चालते व्हा, अन्यथा कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 01:34 AM2017-10-06T01:34:29+5:302017-10-06T01:34:43+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वसतिगृहात काही विद्यार्थी व अभ्यागत अवैधपणे राहत असल्याची अनेकदा ओरड होते.

Run within a week, otherwise take action | आठवडाभरात चालते व्हा, अन्यथा कारवाई

आठवडाभरात चालते व्हा, अन्यथा कारवाई

Next
ठळक मुद्देवसतिगृहात अवैध पद्धतीने राहणाºयांना नोटीस : नागपूर विद्यापीठाचे कडक धोरण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वसतिगृहात काही विद्यार्थी व अभ्यागत अवैधपणे राहत असल्याची अनेकदा ओरड होते. पात्र विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळावा यासाठी विद्यापीठाने २०१६ पासून केंद्रीय प्रवेश पद्धत सुरू केली. मात्र तरीदेखील विधी विद्यापीठ परिसरात असलेल्या विद्यार्थी वसतिगृहात काही जण अवैध पद्धतीनेच राहत असल्याच्या विद्यापीठाकडे तक्रारी आल्या आहेत. यासंदर्भात प्रशासनाने कडक पवित्रा घेतला असून आठवडाभरात वसतिगृह रिकामे करण्याची सूचना देण्यात आली आहे. वसतिगृहात याबाबत नोटीसदेखील लावण्यात आली असून १२ आॅक्टोबरनंतर थेट सुरक्षारक्षक कारवाई करतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
नागपूर विद्यापीठाच्या वसतिगृहासंदर्भात विद्यापीठ प्रशासनाकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. बाहेरील विद्यार्थी येथे राहत असून प्रवेशित विद्यार्थ्यांना याचा त्रास होतो. यासंदर्भात पावले उचलत विद्यापीठाने येथे प्रवेशित विद्यार्थ्यांची यादीच संकेतस्थळावर जाहीर केली होती.
कोणत्या अभ्यासक्रमाचा कुठला विद्यार्थी कुठल्या खोलीमध्ये राहतो, इतकी ही सविस्तर माहिती होती. त्यापुढे जाऊन आता अशा प्रकारांना चाप लागावा, यासाठी प्रवेशप्रक्रियेची प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने करण्यात आली.
वसतिगृहांची सुधारणा करण्यासाठी विद्यापीठाने मागील शैक्षणिक सत्रात विशेष समिती नेमली होती. या समितीने ज्यावेळी विधी विद्यापीठ परिसरातील वसतिगृहाची पाहणी केली तेव्हा प्रवेशित नसलेले अनेक विद्यार्थी तसेच अभ्यागत तेथे राहत असल्याचे आढळून आले होते. यंदादेखील वसतिगृहातील प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असून सर्व खोल्या भरल्या आहेत.
एका खोलीत दोन विद्यार्थ्यांना राहण्याची परवानगी असतानादेखील काही ठिकाणी चार ते पाच विद्यार्थी राहत आहेत. अवैध पद्धतीने राहणाºया विद्यार्थ्यांमुळे नियमित विद्यार्थ्यांना त्रास होत असल्याच्या तक्रारी विद्यापीठ प्रशासनाला प्राप्त झाल्या.
यासंदर्भात विद्यापीठाने एक नोटीसच जारी केली आहे. अवैध पद्धतीने राहणारे विद्यार्थी व अभ्यागतांनी १२ आॅक्टोबरपर्यंत वसतिगृह रिकामे करावे. अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे या माध्यमातून बजावण्यात आले आहे.
सुरक्षा रक्षकांची घेणार मदत
सद्यस्थितीत नागपूर विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारत परिसरात महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळातर्फे संचालित ‘एमएसएफ’चे (महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स) सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. ९ आॅक्टोबरपासून ‘एमएसएफ’चे सुरक्षा रक्षक वसतिगृहांमध्येदेखील तैनात करण्यात येतील. १२ आॅक्टोबरपासून ते अवैध पद्धतीने राहणाºया विद्यार्थ्यांना बाहेर काढतील, असे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी स्पष्ट केले.
प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय का ?
बाहेरगावाहून आलेल्या गरीब विद्यार्थ्यांची सोय व्हावी यासाठी वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र काही विद्यार्थी येथे वर्षानुवर्षे ठाण मांडून आहेत. नियमांनुसार नियमित विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले आहेत. मात्र वारंवार विनंती करूनदेखील अवैध पद्धतीने काही विद्यार्थी व अभ्यागत येथे राहत आहेत. त्यांच्यामुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांनी त्रास व अन्याय का सहन करायचा, असा प्रश्न कुलगुरूंनी केला. अवैध पद्धतीने राहणाºयांना वसतिगृह रिकामे करण्यासाठी आम्ही पुरेसा कालावधी दिला आहे. विद्यार्थी संघटनांनीदेखील प्रामाणिक विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता सहकार्य केले पाहिजे, असे प्रतिपादन डॉ.काणे यांनी केले.

Web Title: Run within a week, otherwise take action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.