आचारी पळाला, वऱ्हाडी उपाशी
By admin | Published: February 26, 2015 02:18 AM2015-02-26T02:18:10+5:302015-02-26T02:18:10+5:30
लग्न लागायला केवळ काही मिनिटे शिल्लक असताना वऱ्हाड्यांसाठी भोजन तयार करणारा आचारीच पळून जाण्याचा धक्कादायक प्रकार अजनी पोलीस ठाणे हद्दीतील मानेवाडा रोड येथे घडला.
नागपूर : लग्न लागायला केवळ काही मिनिटे शिल्लक असताना वऱ्हाड्यांसाठी भोजन तयार करणारा आचारीच पळून जाण्याचा धक्कादायक प्रकार अजनी पोलीस ठाणे हद्दीतील मानेवाडा रोड येथे घडला. आरोपी आचाऱ्याने लग्नाला आलेल्या पाहुण्यांसाठी जेवण तयार न करता वर-वधू पक्षाचे ६५ हजार रुपये घेऊन पोबारा केला.
सत्यशील ऊर्फ घोलू शंभरकर रा. चंद्रमणीनगर जादूमहाल रोड असे आरोपी आचाऱ्याचे नाव आहे. बबन कांबळे (६५) रा. जोगीनगर असे फिर्यादी पीडिताचे नाव आहे. बबन कांबळे यांचा मुलगा अनय याचा विवाह दिलीप पाटील रा. पार्वतीनगर यांची मुलगी कोमल हिच्याशी मानेवाडा रोडवरील स्वाती लॉन येथे २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता ठरले होते. आरोपी सत्यशील याला भोजन तयार करण्याचे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आला. ८५ हजार रुपयामध्ये सौदा पक्का झाला. अॅडवान्स म्हणून पाच हजार रुपये दिले. काही दिवसानंतर सामान घेण्यासाठी ४० हजार रुपये दिले.
लग्नाच्या दोन दिवसांपूवी पुन्हा २० हजार रुपये दिले, असे एकूण ६५ हजार रुपये देऊन झाले. लग्नाचा दिवस उजाडला. दुपारी वर-वधू पक्षाची मंडळी लॉनवर जेवणाची तयारी वघण्यासाठी गेले असता. आचारी कुठेच नव्हता. त्यामुळे त्याला फोन लावण्यात आला. तेव्हा त्याने मोबाईलवर सांगितले की, आज दोघांकडील लग्नाचे आॅर्डर आहेत. त्यामुळे लॉनमध्ये स्वयंपाक न करता बाहेर दोन्हींचा स्वयंपाक सुरू आहे, सायंकाळपर्यंत सर्व व्यवस्था नीट होईल, तुम्ही काळजी करू नका. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून वर-वधीू पक्षाची मंडली आपल्या कामाला लागली. मात्र सायंकाळी ५ वाजता आचाऱ्याला पुन्हा फोन लावला असता त्याने मोबाईल बंद करून ठेवला आणि पैशे घेऊन पोबारा केला. इकडे वऱ्हाडी यायला सुरुवात झाली होती. अशा परिस्थितीत काय करावे, हा प्रश्न होता. तेव्हा धावपळ करुन ऐन वेळेवर दुसऱ्या आचाऱ्याची व्यवस्था करण्यात आली. स्वयंपाक झाला, परंतु तोपर्यंत चांगलाच उशीर झाला होता. अर्धेअधिक वऱ्हाडी उपाशी गेले. आचाऱ्याने केलेल्या या फसवणुकीमुळे वधू-वर मंडळींचे आर्थिक नुकसान तर झालेच, परंतु त्याहूनही अधिक त्यांच्या मान सन्मानालाही धक्का पोहोचला. (प्रतिनिधी)
पोलिसांनी घेतली पीडिताचीच उलटतपासणी
एकीकडे आर्थिक नुकसान तर दुसरीकडे प्रचंड मानसिक धक्का पोहोलेले पीडित वराचे वडील बबन कांबळे हे न्यायाच्या अपेक्षेने अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास गेले. त्या अवस्थेतही त्यांनी आपली आपबिती सांगितली, परंतु पोलिसांनी पीडिताचे शांतपणे ऐकून घेण्याऐवजी त्यांचीच उलटतपासणी घ्यायला सुरुवात केली. फिर्यादीने लिखित तक्रार अर्ज दिला. तेव्हा त्यात चूक काढून पुन्हा नव्याने अर्ज लिहून आणण्यास आले. तासाभरानंतर पुन्हा नव्याने तक्रार अर्ज लिहून पोलिसांकडे सोपविण्यात आली. परंतु अजूनपर्यंत या तक्रार अर्जावर कुठलाही कारवाई झालेली नाही.