धावत्या ‘आपली बस’ने घेतला पेट, प्रवाशांसह चालक व वाहक सुखरूप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2023 11:14 AM2023-04-28T11:14:15+5:302023-04-28T11:15:20+5:30
कामठी-कळमना मार्गावरील घटना
कामठी (नागपूर) : धावत्या ‘आपली बस’च्या इंजिनमधून धूर निघत असल्याचे लक्षात येताच चालकाने बस राेडलगत उभी करून प्रवाशांना खाली उतरण्याची सूचना केली. सर्वजण खाली उतरून दूर जाताच बसने पेट घेतला. सुदैवाने यात कुणालाही दुखापत झाली नाही. ही घटना कामठी-कळमना-नागपूर मार्गावर गुरुवारी (दि. २७) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली.
एएच-३१/के-००७१ क्रमांकाची आपली बस गुरुवारी सायंकाळी कामठी शहरातील बसस्थानक चाैकातून २७ प्रवाशी घेऊन कामठी-कळमना मार्गे नागपूर शहराच्या दिशेने निघाली. ही बस कळमना मार्गे इतवारी (नागपूर)पर्यंत जाणार हाेती. दरम्यान, कळमना शिवारात बसच्या इंजिनमधून धूर निघत असल्याचे चालकाच्या निदर्शनास आले. त्याने समयसूचकता बाळगत बस राेडलगत उभी केली आणि प्रवाशांना खाली उतरण्याची सूचना केली.
प्रवाशी सावधगिरी बाळगत बसमधून उतरले आणि दूरवर गेले. त्यामुळे कुणालाही दुखापत झाली नाही. लगेच कळमना (नागपूर) पाेलिसांना सूचना देण्यात आली. जवळच घराचे बांधकाम सुरू असल्याने घरमालकाने माेटारपंप सुरू करून बसवर पाण्याचा मारा केला. त्यामुळे आग विझली व बसचा भडका उडाली नाही. कळमना पाेलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.