धावत्या बोलेरोचे टायर फुटले,२५ मजूर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 11:00 PM2018-07-25T23:00:06+5:302018-07-25T23:01:47+5:30

धान रोवणीसाठी मजुरांना घेऊन जाणाऱ्या बोलेरो वाहनाचा टायर फुटला. त्यामुळे वाहन पलटी होऊन त्यात २५ मजूर जखमी झाले. हा अपघात नागपूरनजीकच्या भिवापूर भागातील जवराबोडी शिवारात बुधवारी (दि. २५) सकाळी ७.४५ वाजताच्या सुमारास झाला. अपघातातील जखमींना ग्रामीण रुग्णालयात हलविले. मात्र तिथे असलेल्या असुविधांमुळे जखमींना त्रास सहन करावा लागला. यामुळे नागरिकांनी रोष व्यक्त करीत रुग्णालयाला कुलूप लावले. परिणामी काही वेळ वातावरण तापले होते.

Running Bolero's tyre burst, 25 Laborers injured | धावत्या बोलेरोचे टायर फुटले,२५ मजूर जखमी

धावत्या बोलेरोचे टायर फुटले,२५ मजूर जखमी

Next
ठळक मुद्देनागपूरनजीकच्या भिवापूर भागातील जवराबोडी शिवारातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : धान रोवणीसाठी मजुरांना घेऊन जाणाऱ्या बोलेरो वाहनाचा टायर फुटला. त्यामुळे वाहन पलटी होऊन त्यात २५ मजूर जखमी झाले. हा अपघात नागपूरनजीकच्या भिवापूर भागातील जवराबोडी शिवारात बुधवारी (दि. २५) सकाळी ७.४५ वाजताच्या सुमारास झाला. अपघातातील जखमींना ग्रामीण रुग्णालयात हलविले. मात्र तिथे असलेल्या असुविधांमुळे जखमींना त्रास सहन करावा लागला. यामुळे नागरिकांनी रोष व्यक्त करीत रुग्णालयाला कुलूप लावले. परिणामी काही वेळ वातावरण तापले होते.
वाशी येथील एमएच-४०/बीजी-३०१० क्रमांकाच्या बोलेरो पिकअपने गोसेखुर्द पुनर्र्वसित मरुपार व सालेशहरी येथील मजूर नक्षीकडे धान रोवणीसाठी जात होते. दरम्यान जवराबोडी शिवारात टायर फुटल्याने वाहन उलटले. वेगात असलेले वाहन उलटल्याने त्यातील २५ मजूर जखमी झाले. त्यांना लगेच भिवापूर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले. तेथून १५ जणांना नागपूरला हलविले. अपघाताची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते राजू पारवे यांनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन जखमींची आस्थेवाईकपणे चौकशी केली. त्यानंतर आ. सुधीर पारवे, चरणजितसिंग अरोरा, कृष्णा घोडेस्वार, कैलास कोमरेल्लीवार, करीम शेख यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते आदी रुग्णालयात पोहोचले.

रुग्णालयाला ठोकले कुलूप
अपघातातील जखमींना ग्रामीण रुग्णालयात हलविले. परंतु तेथे एक डॉक्टर आणि एकच परिचारिका होती. त्यामुळे जखमींवर उपचार करण्यासाठी तारांबळ उडाली. जखमींचा आकांत पाहून रुग्णालयातील सफाई कामगारही मदतीसाठी पुढे सरसावले. जखमींवर उपचार करूनही काहींना नागपूरला हलविले. मात्र ग्रामीण रुग्णालयात अशी स्थिती नेहमीच उद्भवते. याबाबत वृत्तपत्रामध्ये प्रकाशित होऊनही प्रशासनाचे डोळे उघडत नसल्याचा संताप व्यक्त करीत सामाजिक कार्यकर्ते राजू पारवे यांनी रुग्णालयाला कुलूप ठोकले. माजी सभापती कृष्णा घोडेस्वार, युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख संदीप निंबार्ते, युवक काँग्रेसचे कीर्तिसिंग चौरे, पुरुषोत्तम फाये, रमेश भजभुजे आदी यावेळी उपस्थित होते. तणावाची स्थिती पाहता चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. दरम्यान तहसीलदार डी. जी. जाधव यांनी रुग्णालय गाठून पारवे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर जाधव यांनी वरिष्ठ अधिकारी व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसह उपजिल्हाधिकाऱ्यांसोबत पारवे यांची चर्चा घडवून आणली. दोन दिवसांत आरोग्य विभागाची बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर रुग्णालयाचे कुलूप काढण्यात आले.

जखमींना आर्थिक मदत
जखमी झालेले सर्व शेतमजूर हे प्रकल्पग्रस्त आहे. पुनर्वसनस्थळावर रोजगाराचे साधन नसल्याने त्यांना रोजगारासाठी इतरत्र भटकावे लागते. अपघातातील जखमांपेक्षा आमच्यासाठी रोजी बुडाल्याची वेदना अधिक असून उपचारासाठीसुद्धा पदरात दमडी नसल्याची व्यथा जखमी शेतमजूर करिश्मा मानकर यांनी मांडली. मजुरांची स्थिती बघून लगेच सामाजिक कार्यकर्ते राजू पारवे यांनी मदतीचा हात पुढे केला. त्यांनी जखमींना आर्थिक मदत केली.

Web Title: Running Bolero's tyre burst, 25 Laborers injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.