औैषधांसाठी धावाधाव

By admin | Published: March 2, 2015 02:24 AM2015-03-02T02:24:29+5:302015-03-02T02:24:29+5:30

स्वाईन फ्लूचा संसर्ग वाढत असताना मेडिकल, मेयोसह महापालिकेच्या दवाखान्यात प्रतिबंधक टॅमीफ्लूच्या औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे.

Running for Drugs | औैषधांसाठी धावाधाव

औैषधांसाठी धावाधाव

Next

नागपूर : स्वाईन फ्लूचा संसर्ग वाढत असताना मेडिकल, मेयोसह महापालिकेच्या दवाखान्यात प्रतिबंधक टॅमीफ्लूच्या औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये फारच कमी साठा उपलब्ध आहे, तर खासगी रुग्णालयांना आरोग्य विभाग किंवा मनपाकडून औषध देणे बंद केल्याची माहिती आहे. शहरात फक्त एकाच औषध विक्रेत्याकडे हे औषध उपलब्ध आहे. परिणामी, रुग्णांच्या नातेवाईकांना औषधांसाठी धावाधाव करावी लागत आहे.
रुग्णांचा जीव टांगणीला
अपुऱ्या सोयींमुळे स्वाईन फ्लूचा धोकाही वाढत चालला आहे. गेल्या दोन महिन्यात स्वाईन फ्लूने ५९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ३००वर गेली आहे. विशेष म्हणजे, नव्या निर्देशानुसार ५० खाटा असलेल्या खासगी इस्पितळांनी स्वाईन फ्लूचा स्वतंत्र कक्ष तयार केला आहे. बहुसंख्य खासगी इस्पितळांतील हे कक्ष फुल्ल आहेत. सध्याच्या घडीला स्वाईन फ्लूचे पन्नासवर तर संशयित पाचशेवर रुग्ण विविध इस्पितळात उपचार घेत आहेत. परंतु टॅमीफ्लू औषध मिळत नसल्याने रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे.
फक्त एकाच दुकानात औषध उपलब्ध
एका खासगी इस्पितळाच्या डॉक्टराने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले, गेल्या आठवड्यापासून शासकीय विभागाकडून टॅमीफ्लू औषध देणे बंद केले आहे. यातच हे औषध शेड्यूल एक्स श्रेणीत येते. यामुळे विशिष्ट खासगी दुकानातच हे औषध उपलब्ध होते. परंतु गेल्या काही दिवसांत कंपन्याकडूनच औषधांचा पुरवठा कमी झाल्याने शहरात फक्त सीताबर्डी येथील एकाच दुकानातच हे औषध उपलब्ध आहे. या संदर्भात महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या डॉ. सविता मेश्राम यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

अवकाळी पावसामुळे स्वाईन फ्लू आणखी पसरण्याचा धोका वर्तविला जात आहे. परंतु आरोग्य विभागाने गेल्या आठवड्यापासून टॅमीफ्लूची औषधे देण्यास अखडता हात घेतल्याने शासकीयसह खासगी रुग्णालये अडचणीत आले आहेत. आरोग्य विभागाच्या उपसंचालक कार्यालयाकडून शासकीय रुग्णालयांना या औषधांचा पुरवठा होतो. परंतु गेल्या काही दिवसांत मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाला आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, मागील आठवड्यात इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाकडे (मेयो) टॅमीफ्लू औषध नव्हते. आरोग्य विभागाला मागणी करूनही वेळेवर औषध उपलब्ध होऊ शकले नाही, अखेर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाकडून (मेडिकल) उधारीवर औषध घ्यावे लागले.(प्रतिनिधी)

Web Title: Running for Drugs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.