मदतीसाठी धावले ‘लोकमत’
By admin | Published: August 14, 2015 03:22 AM2015-08-14T03:22:20+5:302015-08-14T03:22:20+5:30
नागरिकांच्या मदतीला ‘लोकमत’चे पत्रकार योगेश पांडे व छायाचित्रकार विशाल महाकाळकर धावून गेले व पाण्यात अडकलेल्या सुमारे १२ ते १५ जणांना सुखरुपपणे बाहेर काढले.
नागपूर : धो धो कोसळणारा पाऊस, रस्त्यावर कंबरेपर्यंत साचलेले पाणी आणि त्यातच सहजपणे उभेदेखील राहू न देणारा पाण्याचा जोरदार प्रवाह. नेमका अंदाज न आल्याने अनेक नागरिक पाण्यातून रस्ता ओलांडायला गेले अन् अडकून बसले. मदतीची हाक ऐकण्यासाठी ना पोलीस ना प्रशासन. अशा स्थितीत नागरिकांच्या मदतीला ‘लोकमत’चे पत्रकार योगेश पांडे व छायाचित्रकार विशाल महाकाळकर धावून गेले व पाण्यात अडकलेल्या सुमारे १२ ते १५ जणांना सुखरुपपणे बाहेर काढले.
सकाळपासूनच पावसाचा जोर वाढला असल्याने ‘लोकमत’ची चमू वार्तांकनासाठी बाहेर पडली होती. झाशी राणी चौक, मुंजे चौक तसेच मोरभवनसमोरील भागात कंबरभर पाणी साचले होते. शिवाय नागनदीचे पाणी पातळी सोडून रस्त्यांवरून वाहत होते. त्यामुळे झाशी राणी चौकाकडून मुंजे चौकाकडे पाण्याचा जोरदार प्रवाह येत होता व यामुळे एकमेकांची मदत घेतल्याशिवाय नागरिकांना चालता येणे शक्य नव्हते. अशा स्थितीत झाशी राणी चौकातच दोन जेष्ठ नागरिक पाण्यात अडकले होते. पाण्याच्या प्रवाहामुळे पाऊल टाकण्याचीदेखील त्यांची हिंमत होत नव्हती व क्षणाक्षणाला पाणी वाढत होते. ‘लोकमत’ चमूने तत्काळ त्यांच्याकडे धाव घेतली व त्यांना पाण्यातून बाहेर काढले.
यानंतर मुंजे चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर एका तरुणीला पाण्याचा अंदाज आला नाही व ती पडली. नाका-तोंडात गेलेले पाणी व पाण्याचा प्रवाह यामुळे ती घाबरून गेली होती व उठण्यासाठी तिची धडपड सुरू होती. ‘लोकमत’ चमूने त्या मुलीलादेखील पाण्यातून बाहेर काढले व सुरक्षित ठिकाणी पोहोचवले. याशिवाय जवळील ‘मॉल’मध्ये अडकलेल्या काही महिला कर्मचारी, कामठीकडे निघालेले शाळकरी विद्यार्थी व एका मूकबधिर तरुणालादेखील अशाच पद्धतीने मदतीचा हात देण्यात आला. यानंतर इतर नागरिकांनीदेखील मदतीचा हात देण्यास सुरुवात केली.(प्रतिनिधी)
संभाव्य धोका टाळला
झाशी राणी चौकाजवळील एका विद्युत ‘डीपी’पर्यंत पाणी भरत आले होते. या ‘डीपी’मध्ये वीजप्रवाह सुरू असल्याची माहिती स्थानिक दुकानदारांनी दिली. ‘लोकमत’ चमूने पुढाकार घेत नागरिकांना तेथील धोक्याबाबत सूचना देण्यास सुरुवात केली व विद्युत मंडळाला याची माहिती देऊन संभाव्य धोका टाळला.