ग्रामीण भागात ४० टक्के रुग्ण निघताहेत पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:08 AM2021-05-07T04:08:49+5:302021-05-07T04:08:49+5:30
नागपूर : शहरापुरता मर्यादित असलेला कोरोना हळूहळू ग्रामीण भागात शिरला. आज या कोरोनाने ग्रामीण भागाला इतके झपाटले की ४० ...
नागपूर : शहरापुरता मर्यादित असलेला कोरोना हळूहळू ग्रामीण भागात शिरला. आज या कोरोनाने ग्रामीण भागाला इतके झपाटले की ४० टक्केवर पॉझिटिव्हचा दर गेला. ग्रामीण भागातील गावागावात आणि घराघरात आज कोरोना संक्रमित रुग्ण आहे. ग्रामीण भागात विशेष उपचाराची व्यवस्था नसल्याने घरांमध्येच मृत्यू होत आहे. ४० टक्केवर पोहचलेला पॉझिटिव्हचा दर, हा प्रशासनासाठी अलर्ट आहे. ग्रामीणची आरोग्य यंत्रणा हा भार पेलण्यास सक्षम नसल्याची खंत स्वत: जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी व्यक्त केली आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणेचे कार्यक्षेत्र पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या गावापुरते मर्यादित आहे. नगरपरिषद व नगरपंचायत स्वतंत्र यंत्रणा आहे. परंतु यांच्याकडे आरोग्य यंत्रणा सक्षम नाही. त्यामुळे याचाही भार जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणेवर आहे. प्रत्येक तालुक्यात ग्रामीण रुग्णालय आहे पण रुग्णालयाची यंत्रणाही कमकुवत आहे. आजच्या घडीला शहरापेक्षा जास्त कहर ग्रामीण भागात झाला आहे. जिल्ह्यात ७७० ग्रामपंचायती तर १८०० वर गावे आहेत. ४९ प्राथमिक आरोग्य केंद्र व ३१६ उपकेंद्र ग्रामीण भागातील जनतेच्या दिमतीला आहे. अशातही मेडिकल स्टाफचा मोठा तुटवडा आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणेचा अर्धा कणा कोरोनाने मोडला आहे. २० लाखावर लोकसंख्या असतानाही विशेष उपचाराच्या सोयी ग्रामीण भागात नाही. बहुतांश वर्ग सरकारी यंत्रणांवरच अवलंबून आहे. मोडकळीस आलेल्या आरोग्य यंत्रणेमुळे आज कोरोनाचा दर ४० टक्केवर गेला आहे.
लोकं ऐकत नाही, जनजागृती नाही. लसीकरणाबाबतचा मोठा गैरसमज आहे. वेळेवर टेस्टिंग आणि ट्रीटमेंट करीत नाही. विटॅमिनच्या गोळ्यांवर जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा कोरोनाशी लढत आहे. त्याचा परिणाम म्हणून पॉझिटिव्ह वाढतात आणि मृत्यूही.
- ग्रामीण भागातील गेल्या १० दिवसातील पॉझिटिव्ह
५ मे
टेस्टिंग - ६३१४ पॉझिटिव्ह - १८५३
४ मे
टेस्टिंग - ५६९६ पॉझिटिव्ह - १६७४
३ मे
टेस्टिंग - ३४५२ पॉझिटिव्ह - १८१४
२ मे
टेस्टिंग - ३३५७ पॉझिटिव्ह - २७२४
१ मे
टेस्टिंग - ५९६० पॉझिटिव्ह - २४७९
३० मार्च
टेस्टिंग - ४५०१ पॉझिटिव्ह - २८०२
२९ मार्च
टेस्टिंग - ७०८४ पॉझिटिव्ह - ३०६७
२८ मार्च
टेस्टिंग - ७२८३ पॉझिटिव्ह - २६९०
२७ मार्च
टेस्टिंग - ५७८५ पॉझिटिव्ह - २४६६
२६ मार्च
टेस्टिंग - ४२२७ पॉझिटिव्ह - २१८२
- प्रशासनाची ग्रामीण भागातील नोंदणीकृत आकडेवारी
आतापर्यंत तपासलेले नमुने - ६ लाख ८३ हजार ५०४
आतापर्यंत आलेले पॉझिटिव्ह - १ लाख २४ हजार ५०६
आतापर्यंत झालेले मृत्यू - २००१
- एकीकडे ग्रामीणमध्ये टेस्टिंग कमी होत आहे. टेस्टिंग झाल्यानंतर रुग्णाला वाऱ्यावर सोडतात. सरकारी यंत्रणेजवळ विटॅमिन गोळ्याशिवाय दुसरा पर्याय नाही. कोणतेही मॉनिटरींग नाही. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग नाही. रुग्णांना आयसोलेट करण्याची व्यवस्था नाही. लोकंही प्रकृती जास्त अत्यवस्थ झाल्यावर रुग्णालयात धाव घेतात. त्यामुळे २५ टक्के लोक गंभीर होत आहे. दर्जेदार आरोग्याची सुविधा नाही. लक्ष देणारे कोणी नाही. ग्रामीण भागातील संपूर्ण यंत्रणा रामभरोसे आहे.
डॉ. राजीव पोतदार
- लोक ऐकत नाही. भाजीपाल्यासाठी गर्दी करतात. सायंकाळी एकत्र येतात. मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे याबाबत जनजागृती नाही. टेस्टिंगसाठी गैरसमज आहे. त्यामुळे कोरोना झपाट्याने पसरतो आहे. जिल्हा प्रशासनाने कडक लॉकडाऊन न केल्यास परिस्थिती आटोक्यात येऊच शकत नाही.
दिनेशचंद्र बंग, जि.प. सदस्य
- जिल्ह्यातील नगरपरिषद, नगरपंचायतीकडे आरोग्य यंत्रणा अपुरी आहे. तालुका रुग्णालये सक्षम नाहीत. संपूर्ण ग्रामीण भागाचा भार हा जिल्हा परिषदेवर आहे. त्यातही मनुष्यबळाचा अभाव आहे. जिल्हा परिषदेने वेळोवेळी नगरपरिषद व नगरपंचायतीला आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे. पण दखल झाली नाही. जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सक्षम करणार नाही, तोपर्यंत कंट्रोल करणे अवघड आहे.
शरद डोणेकर, माजी आरोग्य सभापती, जि .प.