ग्रामीणमध्ये २० टक्के नागरिकांनीच घेतला दुसरा डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:16 AM2021-09-02T04:16:40+5:302021-09-02T04:16:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात लसीकरण वाढविण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात येत आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात लसीकरण वाढविण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात येत आहे. शहर वगळता जिल्ह्यात ९ लाख ५४ हजार २५१ (६८.४२ टक्के) नागरिकांना पहिला डोस मिळाला असून, २ लाख ९० हजार ९५२ जणांनी (२०.८६ टक्के) दुसरा डोस घेतला आहे. तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी ग्रामीण भागात विशेष लसीकरण मोहीम राबविण्यावर जिल्हा प्रशासनाचा भर आहे.
ग्रामीण भागातील ग्रामपंचायतस्तरावरसुद्धा लसीकरण सुरू करण्यात आले आहे. पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांना दुसरा डोस देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आजारी तसेच लसीकरण केंद्रापर्यंत ज्या रुग्णांना जाणे शक्य नाही अशा रुग्णांसाठी लसीकरण विशेष सुविधा उपलब्ध आहे. लसीकरणाला गती देण्यासाठी ४० हजार डोसच्या मात्रा प्राप्त झाल्या आहेत. लसीकरणासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येत असून, जनतेने लसीकरणाचे दोन्हीही डोस घेण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे.
उमरेडमध्ये १०० टक्के नागरिकांचा पहिला डोस पूर्ण
लसीकरण मोहिमेंतर्गत उमरेड तालुक्यात १०० टक्के पात्र नागरिकांनी पहिला डोस घेतला असून, दुसरा डोस केवळ ३० टक्के नागरिकांनी घेतला आहे. रामटेक तालुक्यात सर्वात कमी ५५.१३ टक्के नागरिकांना पहिला डोस मिळाला आहे.
तालुकानिहाय पहिला डोस
तालुका - डोस घेतलेल्यांची टक्केवारी
उमरेड - १०० टक्के
पारशिवनी - ७६.४० टक्के
कळमेश्वर - ८५.२० टक्के
भिवापूर - ७४.७५ टक्के
नागपूर ग्रामीण - ७१.२० टक्के
सावनेर - ६७.२३ टक्के
नरखेड - ७०.५५ टक्के
रामटेक - ५५.१३ टक्के
मौदा - ६१.२६ टक्के
कुही - ६२.९८ टक्के
काटोल - ६९.९२ टक्के
कामठी - ६२.०३ टक्के