ग्रामीण भागातील रस्ते ‘जैसे थे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:09 AM2021-02-15T04:09:45+5:302021-02-15T04:09:45+5:30
रामटेक : तालुका उद्योगासोबतच अंतर्गत रस्त्यांच्या विकासातही मागे आहे. एकीकडे चांगले रस्ते तोडून त्यांचे सिमेंटीकरण केले जात आहे तर ...
रामटेक : तालुका उद्योगासोबतच अंतर्गत रस्त्यांच्या विकासातही मागे आहे. एकीकडे चांगले रस्ते तोडून त्यांचे सिमेंटीकरण केले जात आहे तर रामटेक तालुक्यातील रस्त्यांची अवस्था ‘जैसे थे’च आहे.
तालुक्यातील दोन मार्ग राष्ट्रीस महामार्ग प्राधिकरणाकडे असून, उर्वरित बहुतांश मार्ग जिल्हा परिषद व राज्य शासनाच्या बांधकाम विभागाच्या अखत्यारीत आहेत. या मार्गांची रुंदी ३ ते ३.७५ मीटरची आहे. ओव्हरलोड वाहतूक आणि पावसामुळे या मार्गांची अवस्था दयनीय झाली आहे. तालुक्यात १७० किमीचे २३ जिल्हा मार्ग आहेत. यातील १३ रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. या सर्व मार्गांच्या दुरुस्तीसाठी १,१०० लाख रुपयांची आवश्यकता असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी खासगीत दिली. तालुक्यात ७२८.८९ किमीचे एकूण २६० ग्रामीण रस्ते आहेत. त्यात ३८८.८१ किमीच्या पांदण रस्त्यांचा समावेश आहे. यातील ९५ ग्रामीण रस्ते पायी चालण्याच्या लायकीचे नाहीत. यांच्या दुरुस्तीसाठी ५,००० लाख रुपयांची गरज आहे. पुरामुळे खराब झालेल्या २१ रोडच्या खडीकरणाचे प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविले आहेत, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.