ग्रामीण महिला अधिक ‘सुशिक्षित’
By Admin | Published: June 27, 2017 01:48 AM2017-06-27T01:48:13+5:302017-06-27T01:48:13+5:30
पुरे एक बाळ,जाईल सुखाने काळ... हे सुखी कुटुंबासंदर्भातील घोषवाक्याची प्रचिती नागपूर जिल्ह्यात रुजू लागली आहे.
राजीव सिंग। लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पुरे एक बाळ,जाईल सुखाने काळ... हे सुखी कुटुंबासंदर्भातील घोषवाक्याची प्रचिती नागपूर जिल्ह्यात रुजू लागली आहे. घरातील महिला शिक्षित आणि जागरूक असली तर कुटुंबाच्या प्रगतीचा मार्ग अधिक सुकर होतो. नागपूर जिल्ह्यातील कुटुंब नियोजनाच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे. शहरी भागातील स्त्री-पुरुषांच्या तुलनेत ग्रामीण भागातील स्त्री-पुरुष कुटुंब नियोजनासाठी मॉडर्न पद्धतीचा अवलंब करीत असल्याचे तथ्य राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातून पुढे आले आहे.
नागपूर जिल्ह्यात कुटुंब नियोजनाची पद्धत आणि नसबंदी यावर सर्वेक्षण करण्यात आले. तीत ग्रामीण भागात ७८.९ टक्के महिलांनी कुटुंब नियोेजनासाठी सामान्य गर्भनिरोधक पद्धतीचा अवलंब केला आहे. शहरात हे प्रमाण ६४.७ टक्के इतके आहे. शहर आणि ग्रामीण भाग मिळून ही आकडेवारी ६९.१ टक्के आहे. इतकेच काय तर ग्रामीण भागातील ७७.८ टक्के महिलांनी कुटुंब नियोजनासाठी आधुनिक (मॉडर्न) पद्धतीचा अवलंब केला आहे. शहरात हे प्रमाण ६७.९ टक्के इतके आहे. कुटुंब नियोजनासंदर्भातील शस्त्रक्रियेसंदर्भात ग्रामीण भागातील महिलांनी शहरातील महिलांना मागे टाकले आहे. ग्रामीण भागात हे प्रमाण ६८.१ तर शहरात हे प्रमाण केवळ ४५.५ टक्के इतके आहे.
कुटुंब नियोजनासंदर्भातील ही आकडेवारी पाहता ग्रामीण भागातील महिला शहरातील महिलांच्या तुलनेत अधिक ‘सुशिक्षित’ असल्याचे म्हणावे लागेल.
गर्भनिरोधक गोळ्यांचे सेवन करण्याचे प्रमाण गत काही वर्षांत घटले आहे. यातही ग्रामीण भागातील महिला शहरी महिलांच्या तुलनेत जागरूक आहे. कुटुंब नियोजनासाठी ग्रामीण भागातील १.९ टक्के तर शहरातील १.२ टक्के महिला गर्भनिरोधक गोळ्यांचे सेवन करीत आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या वतीने २०१५-१६ या वर्षांत हे सर्वेक्षण करण्यात आले होते. यात जिल्हावार आकडेवारीही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
शहरात कंडोमचा अधिक वापर
कुटुंब नियोजनासंदर्भातील साधनांसाठी कंडोमचा वापर केला जातो. नागपूर जिल्ह्यात १३ टक्के पुरुष कुटुंब नियोजनासाठी कंडोमचा वापर करतात. शहरात हे प्रमाण १५.३ तर ग्रामीण भागात हा आकडा ७.८ टक्के इतकाच आहे. कुटुंब नियोजनात कंडोमचा वापर अधिक व्हावा यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने जनजागृती केली जात आहे.
शहरात पुरुष तर गावात महिला साक्षरतेत आघाडीवर
सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार नागपूर जिल्ह्यातील ८९.६ महिला आणि ९७.४ टक्के पुरुष साक्षर आहेत. शहर आणि ग्रामीण भागातील महिलांचे साक्षरतेचे प्रमाण पाहता ग्रामीण भागात ९० टक्के तर शहरातील ८९.४ टक्के महिला साक्षर असल्याचे दिसून आले आहे. पुरुषांच्या बाबतीत हे उलट ठरले. शहरात ९८ टक्के पुरुष साक्षर आहेत. ग्रामीण भागात ही आकडेवारी ९६.४ टक्के इतकी आहे.
१.६ टक्के महिला १९ व्या वर्षी झाल्या आई
१९ वर्षे आणि या खालील वयोगटात मुलींना गर्भधारणा होण्याचे प्रमाण नागपूर जिल्ह्यात १.६ टक्के इतके आहे. शहरात हे प्रमाण १.८ तर ग्रामीण भागात हे प्रमाण १.३ टक्के इतके आहे. १८ वर्षापूर्वी विवाहबंधनात अडकणाऱ्या ७ टक्के महिला जिल्ह्यात दिसून आल्या. शहरात ही आकडेवारी ६.१ तर ग्रामीण ९.५ टक्के इतकी आहे.
कुटुंब नियोजनात शहरी महिलांना टाकले मागे
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातील वास्तव
केवळ ०.१ टक्के पुरुषांनी केली नसबंदी
कुटुंब नियोेजनासंदर्भात महिला जितक्या जागृत आहेत तेवढे पुरुष जागृत नसल्याचे स्पष्ट होते. सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील केवळ ०.१ टक्के पुरुषांनी कुटुंब नियोजनासाठी नसबंदी मार्ग अवलंबला आहे. शहरात हे प्रमाण ०.२ टक्के इतके आहे.