रामनामातून मतदारांना साद, प्रत्येक आमदाराला 'टार्गेट अयोध्या'; 5 हजार भाविकांना दर्शन
By योगेश पांडे | Published: January 4, 2024 11:45 PM2024-01-04T23:45:02+5:302024-01-04T23:46:26+5:30
मतदारसंघातून किमान पाच हजार नागरिकांना अयोध्येला नेण्याचे निर्देश : राम मंदिर प्राणप्रतिष्ठेनंतर सुरू होणार प्रवास
नागपूर : अयोध्येतील राम मंदिरात श्रीराम प्राणप्रतिष्ठेसाठी जय्यत तयारी सुरू असताना भाजपकडून वातावरणनिर्मिती करण्यावर भर देण्यात येत आहे. या सोहळ्यानंतर रामनामातून मतदारांपर्यंत पोहोचत जनसंपर्क करण्याचे भाजपकडून नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक आमदाराला त्यांच्या मतदारसंघातून कमीत कमी पाच हजार नागरिकांना अयोध्या मंदिराच्या दर्शनासाठी नेण्याचे टार्गेट देण्यात आले आहे. यासाठी आवश्यक त्या याद्या तयार करण्याच्या सूचनादेखील देण्यात आले आहेत.
नागपुरात हिवाळी अधिवेशन काळात झालेल्या भाजपच्या कार्यकारिणी बैठकीत पक्षश्रेष्ठींनी याबाबत सर्व आमदारांना माहिती दिली. अयोध्येतील राममंदिरासाठी विहिंप, संघासोबत भाजप नेत्यांनी देशभरात वातावरणनिर्मिती केली होती. या मुद्यावरून देशाच्या राजकारणाचे चित्रदेखील बदलले आणि सत्तेवर येण्यात भाजपला बराच फायदादेखील झाला. आता इतक्या वर्षांच्या संघर्षानंतर राममंदिर साकारत असताना भाजपने देशपातळीवर त्या निमित्ताने वातावरण निर्मितीचे नियोजन केले आहे. आगामी निवडणुका लक्षात घेता राज्यात भाजपने हा पुढाकार घेतला आहे.
या अंतर्गत राममंदिरात प्राणप्रतिष्ठा झाल्यावर पुढील काही महिन्यांत प्रत्येक आमदाराला त्यांच्या मतदारसंघातील ५ हजार नागरिक अयोध्येला नेण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एकदा यादी तयार झाली की टप्प्याटप्प्याने नागरिकांना अयोध्येत पाठविण्यात येईल. अयोध्येत पक्षाकडून निवास, भोजन, प्रत्यक्ष मंदिरात नेणे इत्यादी बाबींची व्यवस्था करण्यात येईल. त्यासाठी विशिष्ट पदाधिकाऱ्यांना जबाबदारी देण्यात येईल व काही महिने त्यांचा तेथेच मुक्काम असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. काही पदाधिकाऱ्यांनी अयोध्येत जाऊन एकूण व्यवस्थेचे नियोजनदेखील केले असून देशपातळीवरील मोहिमेचाच हा एक भाग असेल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
रेल्वेगाड्याच बुक करणार
राज्यातील विविध मतदारसंघातील लाखो नागरिकांना विधानसभा निवडणुकीपर्यंत अयोध्येला नेण्यात येणार आहे. विविध टप्प्यात हा प्रवास होईल. एकाच मार्गावरील मतदारसंघातील नागरिकांच्या सोयीसाठी रेल्वेगाड्याच बुक करण्यात येणार आहेत. या गाड्यांना ‘रामलल्ला दर्शन विशेष ट्रेन’ असेच नाव देण्यात येणार आहे. नागरिकांचे रेल्वेगाड्यांत आरक्षण करता यावे यासाठी याद्या तयार करण्यावर भर देण्यात येणार आहे.
खासदारांना २० हजारांचे लक्ष्य
आमदारांसोबतच भाजपने राज्यातील सर्व खासदारांनादेखील विशिष्ट लक्ष्य दिले आहे. त्यांना २० हजार नागरिकांना दर्शन करावयाचे आहे. यासोबतच जेथे भाजपचे आमदार, खासदार नाहीत तेथे लोकसभा किंवा विधानसभा निवडणूक प्रमुख अथवा प्रमुख पदाधिकाऱ्यांना याची जबाबदारी देण्यात आली आहे.