सावरियासे नैना हो गये चार, लागी करेजवा मे कटार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 11:17 PM2019-03-02T23:17:32+5:302019-03-02T23:19:44+5:30

एकेकाळी आपल्या अभिनयाने, गायनाने रसिकांवर भुरळ पाडणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री, गायिका आणि माजी नाट्य संमेलनाध्यक्ष फय्याज यांचा संगीतमय प्रवास त्यांच्याकडूनच ऐकण्याची संधी नागपूरकर रसिकांना मिळाली. फय्याज यांनीही संवादासह लावणी, नाट्यगीत गायन व त्यांनी नाटकात साकारलेल्या भूमिका अभिनयासह सादर करून हा मंतरलेला प्रवास उलगडला. फय्याज यांची ही मुलाखत रसिकांसाठी संगीतमय संवादाची मैफिलच ठरली.

Saavariya naina hai jaaar, lagi karjave mein kadar ... | सावरियासे नैना हो गये चार, लागी करेजवा मे कटार...

सावरियासे नैना हो गये चार, लागी करेजवा मे कटार...

Next
ठळक मुद्देअभिनेत्री फय्याज यांनी उलगडला मंतरलेला प्रवास : राम शेवाळकर जयंती

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एकेकाळी आपल्या अभिनयाने, गायनाने रसिकांवर भुरळ पाडणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री, गायिका आणि माजी नाट्य संमेलनाध्यक्ष फय्याज यांचा संगीतमय प्रवास त्यांच्याकडूनच ऐकण्याची संधी नागपूरकर रसिकांना मिळाली. फय्याज यांनीही संवादासह लावणी, नाट्यगीत गायन व त्यांनी नाटकात साकारलेल्या भूमिका अभिनयासह सादर करून हा मंतरलेला प्रवास उलगडला. फय्याज यांची ही मुलाखत रसिकांसाठी संगीतमय संवादाची मैफिलच ठरली.
प्रसिद्ध वक्ते प्रा. राम शेवाळकर यांच्या ८८ व्या जयंतीचे औचित्य साधून शेवाळकर कुटुंबाच्यावतीने फय्याज यांच्या मुलाखतीचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. प्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी त्यांची मुलाखत घेतली. १९६५ साली नाटककार प्रभाकर पणशीकर यांच्या ‘गीत गायले आसवांनी’ या नाटकाद्वारे त्यांची कारकीर्द सुरू झाली. पणशीकरांचे पुरुषोत्तम दारव्हेकर यांनी दिग्दर्शित केलेले ‘अश्रूंची झाली फुले’ हे नाटकही रसिकांनी डोक्यावर घेतले. या नाटकातील ‘लाखों के बोल सहे सितमगर तेरे लिये...’ हे नाट्यपद त्यांनी सादर केले. यानंतर दारव्हेकर मास्तरांचे लेखन, दिग्दर्शन व पणशीकरांची निर्मिती असलेल्या ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकाने इतिहास घडविला. यामध्ये फय्याज यांच्यासह पं. वसंतराव देशपांडे यांनी ‘खां साहेब’ हे पात्र साकारले. या नाटकाच्या अनेक आठवणींना त्यांनी उजाळा दिला. वसंतरावांनी नागपुरी खाक्यातच या नाटकात काम करण्यास होकार दिला. पं. भानुशंकरच्या भूमिकेत भार्गवराम आचरेकर यांच्या निवडीपर्यंत मास्तरांनी प्रत्येक गोष्टीसाठी परफेक्शनचा आग्रह धरला होता. संगीतकार म्हणून जितेंद्र अभिषेकी यांनी अभिनयासह गायनातील बारीकसारीक गोष्टी समजावून सांगितल्या. ‘दोन उत्तुंग कलावंत एकमेकांना भेटतात तेव्हा सीमा राहत नाही’ असा पं. अभिषेकी व वसंतराव देशपांडे यांचा उल्लेख फय्याज यांनी केला. वसंतरावांनी नाटकात गाणे गाताना रटाळ होण्यापेक्षा रसिकांच्या मनात हुरहूर कायम राहावी, इथपर्यंत गायची शिकवण दिल्याचेही त्यांनी सांगितले. या नाटकाने रसिकांवर जादू केली. १६ वर्षात या नाटकाचे ५३५ प्रयोग केल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. प्रत्येक प्रयोगासाठी फिरताना प्रत्येक कलावंत आपला रियाज करीत असल्याचे त्या म्हणाल्या. पणशीकर हे रत्नपारखी होते व त्यांच्या नाटकांचा प्रत्येक प्रयोग हाऊसफुल होत असल्याचे सांगत या नाटकातील ‘ लागी करेजवा मे कटार...’ ही बंदिश सादर केली.
वि.वा. शिरवाडकरांच्या ‘वीज म्हणाली धरतीला’ या नाटकातील त्यांची जुलेखा ही भूमिका खूपच गाजली. त्याविषयीच्या आठवणी फय्याज यांनी उलगडल्या. प्र.के. अत्रे यांच्या ‘तो मी नव्हेच’ या नाटकातील त्यांनी साकारलेले ‘चन्नाक्का’ हे कन्नड पात्र अभिनयासह सादर केले. ही भूमिका साकारताना पु.ल. देशपांडे यांच्या पत्नी सुनिताबाई यांनी बघितले व त्यांच्या ‘वटवट’ या नाटकासाठी निवड केली. या नाटकातील नाट्यपद फय्याज यांनी यावेळी गायले व सोबतच नजाकत व अदाकारीने सादर केलेली लावणीही रसिकांना घायाळ करून गेली. फय्याज यांच्या आठवणींचा हा संवाद नागपूरकर रसिकांना कायम स्मरणात राहणारा होता. यावेळी विजयाताई शेवाळकर, आशुतोष शेवाळकर, गिरीश गांधी आदी उपस्थित होते. संगीत मैफिलीत तबल्यावर राम ढोक व संवादिनीवर श्रीकांत पिसे यांनी साथसंगत केली.
भाई, घाणेकर खटकलेच
पुलंच्या जीवनावर आलेल्या ‘भाई’ या चित्रपटाविषयी विचारले असता यात अभिनेत्री हिराबाई यांच्याबाबत चुकीची बाजू मांडल्याचे मत त्यांनी मांडले. याशिवाय ‘आणि काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटाविषयी त्यांनी खंत व्यक्त केली. घाणेकर हे मातृभक्त व व्यक्ती म्हणून अतिशय चांगले होते आणि डॉक्टर असल्याने प्रत्येक कलावंताची ते काळजी घेत असतं. ‘कट्यार...’ चित्रपटातील गाण्याच्या रेकार्ड्स पायाने तुडविण्याच्या प्रसंगावरही त्यांनी आक्षेप घेतला. मात्र असे व्यक्तिमत्त्व भूतकाळात घडले होते हे नव्या पिढीपर्यंत पोहचविण्यात या चित्रपटांनी मोलाचे काम केल्याची प्रशस्तीही त्यांनी दिली.

Web Title: Saavariya naina hai jaaar, lagi karjave mein kadar ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.