सचिन कुर्वे यांनी केले नागपूरचे जिल्हा प्रशासन गतिमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 12:23 AM2018-04-17T00:23:41+5:302018-04-17T00:23:53+5:30
जिल्हाधिकारी म्हणून सचिन कुर्वे यांचा नागपूरचा कार्यकाळ अतिशय उत्तम राहिला. त्यांनी नागपूरचे जिल्हा प्रशासन खऱ्या अर्थाने पारदर्शी व गतिमान केले. गेल्या तीन वर्षांत अनेक चांगल्या योजना राबविल्या. त्यांची दखल खुद्द मुख्यमंत्री व पंतप्रधानांनीसुद्धा घेतली. यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट प्रशासनाचा पुरस्कारही मिळाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हाधिकारी म्हणून सचिन कुर्वे यांचा नागपूरचा कार्यकाळ अतिशय उत्तम राहिला. त्यांनी नागपूरचे जिल्हा प्रशासन खऱ्या अर्थाने पारदर्शी व गतिमान केले. गेल्या तीन वर्षांत अनेक चांगल्या योजना राबविल्या. त्यांची दखल खुद्द मुख्यमंत्री व पंतप्रधानांनीसुद्धा घेतली. यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट प्रशासनाचा पुरस्कारही मिळाला.
शासन आपल्या दारी या धर्तीवर त्यांनी प्रशासन आपल्या दारी योजना राबविली. त्यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर शिबिरे आयोजित केली. आॅनलाईन सातबारा सुरू केला. ‘एटीएम’च्या धर्तीवर सातबाराही उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी वेंडिंग एटीएम मशीन जिल्ह्यात सुरू केल्या. शेतकºयांचा त्याला चांगला प्रतिसाद लाभला. वाळूचोरी रोखण्यासाठी ‘ड्रोन’चा वापर करणारे नागपूर हा पहिला जिल्हा ठरला. त्यामुळे वाळूचोरीवर मोठ्या प्रमाणात आळा बसला. जलयुक्त शिवार ही राज्याची महत्त्वाकांक्षी योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात त्यांचा मोलाचा वाटा ठरला. यासाठीही त्यांनी ड्रोनचा वापर खुबीने करून घेतला.
शासकीय प्रकल्पांसाठी लागणारी शासकीय आणि खासगी जागा उपलब्ध करून देणे हे नेहमीच गुंतागुंतीचे काम राहिले आहे. तातडीने जागा मिळत नसल्याने अनेक प्रकल्प रखडल्याचा इतिहास आहे. परंतु नागपुरात मेट्रो रेल्वे प्रकल्प सुरू झाला आणि त्यासाठी लागणारी आवश्यक जागा लगेच उपलब्ध करण्यात आली. त्यामुळे मेट्रो प्रकल्प गतीने सुरू आहे. यात जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांचा महत्त्वाचा वाटा आहे. सर्वसामान्यांना ‘अपॉर्इंटमेंट न घेताही थेट भेटता यावे म्हणून कुर्वे यांनी नागपूरचे जिल्हाधिकारी होताच सकाळी १० ते २ ही वेळ अशा लोकांसाठीच राखून ठेवली होती. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील दलालांचा बंदोबस्त करण्यासाठीही त्यांना नेहमीच आठवणीत ठेवले जाईल. नागपूरचे जिल्हा प्रशासन गतिमान व पारदर्शी करणारे कुर्वे हे नेहमीच नागपूरकरांच्या स्मरणात राहतील.