सचिन कुर्वे नवे जिल्हाधिकारी
By admin | Published: May 15, 2015 02:35 AM2015-05-15T02:35:10+5:302015-05-15T02:35:10+5:30
राज्य शासनाने सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यामुळे नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात प्रशासकीय फेरबदल झाले आहेत.
कृष्णा यांची पुण्याला बदली : नवीन सोना, माधवी खोडे अतिरिक्त आयुक्त
नागपूर: राज्य शासनाने सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यामुळे नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात प्रशासकीय फेरबदल झाले आहेत. नागपूरचे जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांची पुणे येथे महानगर परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर बदली झाली आहे. त्यांचा जागेवर नागपूरमधील वसंतराव नाईक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेचे (वनामती)े संचालक सचिन कुर्वे येत आहेत. कुर्वे हे मूळचे नागपूरचे आहेत.
वर्धेचे जिल्हाधिकारी नवीन सोना हे विभागीय आयुक्त कार्यालयातील नवे अतिरिक्त आयुक्त असतील तर पल्लवी दराडे यांची मुंबईत बदली झाल्यामुळे रिक्त असलेल्या आदिवासी विकास विभागाच्या अतिरिक्त आयुक्तपदी भंडाऱ्याच्या जिल्हाधिकारी डॉ. माधवी खोडे यांची बदली झाली आहे. जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे संकेत यापूर्वीच मिळाले होते. मात्र इतक्या मोठ्या प्रमामात फेरबदल होतील याची कल्पना नव्हती.
नवे जिल्हाधिकारी मूळचे नागपूरचे
३८ वर्षीय सचिन कुर्वे २००३ च्या तुकडीचे उत्तराखंड कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांचे शिक्षण बीईपर्यंत झाले असून ते मूळचे नागपूरचे आहेत. हनुमाननगर येथे त्यांचे निवासस्थान आहे. उत्तराखंडमधून त्यांना प्रतिनियुक्तीवर महाराष्ट्रात आणण्यात आले आहे. त्यांची महाराष्ट्रातील पहिली पोस्टींग मनरेगाचे आयुक्त म्हणून झाली होती. पण दोनच दिवसात तेथून त्यांची बदली वनामतीचे संचालक म्हणून करण्यात आली. आता त्यांच्याकडे जिल्हाधिकारी पदाची सूत्रे सोपवण्यात आली आहेत.