सचिन शिरबाविकरने पूर्ण केली १,५२८ किलोमीटरची सायकल रेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 10:57 PM2020-07-02T22:57:02+5:302020-07-02T22:58:39+5:30
देशातील टाळेबंदीच्या काळात नागपूरचे सचिन शिरबाविकर यांनी डॉ. अमित समर्थ यांच्या मार्गदर्शनात १,५२८ किलोमीटर ‘रेस अक्रॉस वेस्ट’ सायकल स्पर्धेत दिमाखदार यश प्राप्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशातील टाळेबंदीच्या काळात नागपूरचे सचिन शिरबाविकर यांनी डॉ. अमित समर्थ यांच्या मार्गदर्शनात १,५२८ किलोमीटर ‘रेस अक्रॉस वेस्ट’ सायकल स्पर्धेत दिमाखदार यश प्राप्त केले.
प्रो हेल्थ फाऊंडेशन व माईल्स अॅण्ड मायलर्स एन्डूरन्स स्पोटर्स अकादमीच्या सहयोगाने नागपूरच्या इंडिया पॅडल्स संस्थेच्या प्रोत्साहनाने शिरबाविकर यांनी सहभाग घेतला. सुमारे ८० हजार फूट एलिव्हेशन गाठत त्यांनी ही स्पर्धा सात दिवस तीन तासात पूर्ण केली.
प्रत्यक्षात ही स्पर्धा १२ दिवसात पूर्ण करायची होती, पण सचिन यांनी सात दिवसातच ध्येय गाठले. व्हर्च्युअल पद्धतीने झालेल्या या सायकल शर्यतीत सचिन यांच्याव्यतिरिक्त जगभरातील ८३ सायकलपटंनी भाग घेतला होता. ६ जून ते २८ जून दरम्यान ही शर्यत झाली असली तरी सचिन शिरबाविकर यांनी ही स्पर्धा ५ दिवस आधीच पूर्ण केली.
मधुमेहाचे रुग्ण असलेल्या सचिन यांनी या स्पर्धेसाठी आपले वजन २० किलोग्रॅमने घटविले. साखरेची पातळी नियंत्रणात ठेवली. मागील तीन वर्षात अनेक हाफ मॅरेथॉन, आयरन मॅन स्पर्धांत भाग घेऊन पूर्ण केल्या. नागपूर -पचमढी व मनाली-लेह तसेच मुंबई-गोवा या दरम्यानच्या सायकल अभियानातदेखील यशस्वी भाग घेतला.
भारतातून सहा सायकलपटूंनी ही स्पर्धा पूर्ण केली. कुटुंबातील सर्वांचे विशेषत: आई ज्योती, पत्नी अमिता आणि मुलगा श्रीधर यांचे सहकार्य मिळाल्याचे ते सांगतात. डॉ. राजश्री व डॉ. शंतनू सेनगुप्ता, डॉ. अभिनव कन्हेर यांच्या चमूने त्यांच्या वैद्यकीय तपासणीची जबाबदारी सांभाळली. ते आपल्या यशाचे श्रेय वैभव व गायत्री अंधारे, भूषण वासवानी, ज्योती पटेल, ऋषी सेहगल, आशिष उंबरकर यांना देतात.