नागपुरातील गरिबाच्या झोपडीत सचिनचा दुर्मिळ ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 09:33 PM2018-04-23T21:33:56+5:302018-04-23T21:34:11+5:30
क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर याचे जगभरात चाहते आहेत. परंतु नागपुरातील रूपकिशोरचे सचिनबद्दलचे वेड काही औरच आहे. त्याने सचिनच्या नावाने देशात आणि जगात निघालेल्या वस्तूंचा संग्रह केला आहे. रूपकिशोर महाल परिसरातील एका झोपडीत राहतो. या झोपडीत तो या सर्व वस्तू जपतोय.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर याचे जगभरात चाहते आहेत. परंतु नागपुरातील रूपकिशोरचे सचिनबद्दलचे वेड काही औरच आहे. त्याने सचिनच्या नावाने देशात आणि जगात निघालेल्या वस्तूंचा संग्रह केला आहे. रूपकिशोर महाल परिसरातील एका झोपडीत राहतो. या झोपडीत तो या सर्व वस्तू जपतोय.
५० च्यावर वय असलेला रूपकिशोर कनोजिया मातृसेवा संघात काम करायचा. खेळाडू आणि संग्राहकवृत्ती असल्याने आणि त्यातच क्रिकेटचे प्रचंड वेड असल्याने क्रिकेटच्या संदर्भातील अनेक वस्तू त्याच्याकडे आहेत. सचिन हा त्याचा सर्वात आवडता खेळाडू. सचिनच्या पहिल्या टेस्टपासून त्याच्या निवृत्तीच्या सामन्यापर्यंत सर्व सामने रूपकिशोरने बघितले आहे. सचिनची खेळी बघण्यासाठी तो नोकरीचीही पर्वा करीत नव्हता. सचिनची आॅटोबायोग्राफी त्याला मुखद्गत आहे. सचिनने २०० टेस्ट मॅचमध्ये १५हजार ९२१ धावा काढल्या, ५१ शतक ठोकले. ४६३ एकदिवसीय सामने त्याने खेळले १८ हजार ४२६ धावा त्याने केल्या, ४९ शतक त्याने ठोकले. दोन्ही क्रिकेटमध्ये त्याने ३४ हजार ३५७ धावा त्याने ठोकल्या. सचिनची क्रिकेटमधील कारकीर्द अशी पटापट रूपकिशोर सांगतो.
त्याचे खरे कौतुक त्याच्याकडे असलेल्या संग्रहाचे आहे. त्याच्या संग्रहात स्वित्झर्लंडने २०१३ मध्ये सचिन चित्रित असलेले ६,००० रुपये भारतीय किमतीचे चांदीचे नाणे, बूस्ट कंपनीने सचिनवर काढलेले ‘मॅच टॉस कॉईन’ रूपकिशोरच्या संग्रहात बघायला मिळतात. पोस्टल डिपार्टमेंटने सचिनच्या प्रत्येक टेस्ट सामन्यावर फर्स्ट डे कव्हर, पोस्ट तिकीट, माहितीपत्रक, मिनीचर, शीटलेट काढले होते. त्याच्याकडे दोनशेही टेस्ट मॅचचे हे सर्व साहित्य आहे. सचिनने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती, तेव्हा महाराष्ट्र शासनाने ११ आणि ४ लाखाची सागरलक्ष्मी लॉटरी काढली होती. त्यात सचिनचा फोटो होता. ही लॉटरी त्याच्याकडे बघायला मिळते. सचिनच्या २४ एप्रिल १९७३ या जन्मतारखेची नोट आहे. सचिनने केलेले १०० शतक व त्याने क्रिकेटमधून घेतलेला संन्यास या दोन्ही वेळी देशभरातील वृत्तपत्राने विशेष अंक प्रकाशित केला होता. ही सर्व वृत्तपत्रे त्याच्याकडे आहेत. त्याचबरोबर देशातील नामांकित मॅगझिनने सचिनवर काढलेले विशेष अंक त्याच्याकडे आहेत. हा संग्रह इतका आहे की घरात ठेवायला जागा नाही, परंतु त्याने तो सांभाळला आहे.
असा जुळविला संग्रह
जुन्या बाजारात रूपकिशोरला सचिनची आॅटोबायोग्राफी मिळाली. कचऱ्याच्या ढिगाऱ्यात लॉटरीचे तिकीट मिळाले. मित्रांच्या सहकार्याने वृत्तपत्र त्याने गोळा केले. क्रिकेटच्या मॅगझिन जुन्या पुस्तक बाजारात मिळाल्या. खिशातून पैसे खर्च करून क्वॉईन गोळा केले.
सचिन स्वप्नात येतो
शेन वॉर्न जसा सचिनच्या स्वप्नात यायचा. सचिनचे तसे स्वप्न रूपकिशोरलाही पडतात. सचिनच्या या दर्दीला प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा आहे. आपल्या संग्रहावर त्याचा आॅटोग्राफ हवा, असे त्याचे स्वप्न आहे.