काेविड याेद्ध्यांचा भिवापुरातही आंदाेलनाचा पवित्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:07 AM2021-07-23T04:07:28+5:302021-07-23T04:07:28+5:30
भिवापूर : कोरोना संकटकाळात दोन हात करणाऱ्या कोविड याेद्ध्यांना कार्यमुक्त करत, कोविड सेंटर बंद करण्याचा घाट रचल्या जात आहे. ...
भिवापूर : कोरोना संकटकाळात दोन हात करणाऱ्या कोविड याेद्ध्यांना कार्यमुक्त करत, कोविड सेंटर बंद करण्याचा घाट रचल्या जात आहे. आता कर्मचारीच नसल्यामुळे तालुकास्थळावर तपासणी, निदान, उपचारसुद्धा ठप्प आहे. त्यामुळे कंत्राटी कर्मचारी असलेल्या कोविड याेद्ध्यांनी आता आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. यांसदर्भात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
‘मनुष्यबळच नाही तर कोविड सेंटरचे करायचे काय?’ या शीर्षकाखाली गुरुवारी(दि.२२) लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित हाेताच जनमानसात संताप व्यक्त झाला. याची दखल घेत भाजप व युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येत तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांना निवेदन दिले. संभाव्य तिसरी लाट कधी येईल याचा नेम नाही. अशात कंत्राटी मनुष्यबळ कमी करून कोविड सेंटर बंद करण्याचा घाट रचल्याचा आरोप निवेदनातून केला आहे. कार्यमुक्तीचा आदेश तात्काळ मागे घेऊन कोविड सेंटर पूर्ववत सुरू करा, अन्यथा भिवापुरात तीव्र आंदोलन पुकारण्याचा इशारा त्यांनी दिला. यावेळी भाजपचे विवेक ठाकरे, आनंद गुप्ता, हिमांशू अग्रवाल, सचिन ठवकर, पवन ताजने, भूषण नागोशे, धनंजय चौधरी, गजू खांदे यांच्यासह कंत्राटी कर्मचारी उपस्थित होते.
...
आता ठिय्या आंदोलन
कार्यमुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांची भेट घेत आम्ही ठिय्या आंदोलनाचा पवित्रा घेत असल्याचे सांगितले. याबाबत प्रतिनिधीने या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला असता, आमची बैठक असून, त्यात आंदोलनाची दिशा ठरणार असे सांगितले. यावेळी भाग्यश्री भुरे, अश्विनी घरडे, हेमलता दिघोरे, गायत्री तेलंग, सृष्टी डोंगरे, मीना चिकटे, जयश्री मोहोड, शुभांगी वाघमारे, रेश्मा वाघमारे आदी उपस्थित होतेे. काेविड याेद्ध्यांच्या लढ्याला युवामोर्चाचा पाठिंबा राहणार असल्याचे शहर अध्यक्ष हिमांशू अग्रवाल यांनी सांगितले.
...
मानधन कुठाय?
कोविड याेद्ध्यांच्या कार्याची स्तुती करीत एका कार्यक्रमात स्थानिक लोकप्रतिनिधीने कोविड सेंटरमधील डॉक्टर व परिचारिकांना प्रत्येकी ५ ते १० हजार रुपये मानधन देण्याचे जाहीर केले होते. दीड वर्षाच्या कालखंडात पहिली आणि दुसरी लाट ओसरून गेली. मात्र ते मानधन कुठे गेले, हा प्रश्नच आहे. आता संभाव्य तिसरी लाट तोंडावर असताना कोविड याेद्ध्यांना कार्यमुक्त करण्यात आले. त्यामुळे जाहीर केलेले मानधन आम्हाला देऊ नका, पण जनसेवेसाठी आम्हाला कार्यरत ठेवा. कोविड सेंटर बंद करू नका, अशा भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या.
220721\img_20210722_134703.jpg
तहसीलदार अनिरूध्द कांबळे यांना निवेदन देतांना युवा मोर्चाचे पदाधिकारी व कोविड सेंटर मधील परिचारीका भगिनी