वन कर्मचाऱ्यांचे बलिदान प्रेरणादायी
By Admin | Published: September 12, 2016 03:04 AM2016-09-12T03:04:06+5:302016-09-12T03:04:06+5:30
मानवाच्या जीवनात जंगल, वन्यजीव, पर्यावरण आणि निसर्गाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.
वन हुतात्मा दिन : वनबल प्रमुखांचे प्रतिपादन
नागपूर : मानवाच्या जीवनात जंगल, वन्यजीव, पर्यावरण आणि निसर्गाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे या सर्व घटकांचे संरक्षण आणि संवर्धन करणे काळाची गरज आहे. यात वनविभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची मोलाची भूमिका आहे. मात्र अनेकदा संरक्षण करीत असतांना काही आव्हानात्मक स्थितीत वन कर्मचारी वा अधिकाऱ्यांना जीवाचे बलिदान द्यावे लागते. त्यांचे ते बलिदान प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) सर्जन भगत यांनी केले.
वन विभागाच्यावतीने राष्ट्रीय हुतात्मा दिनानिमित्त रविवारी सिव्हिल लाईन्स येथील वन मुख्यालयात एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला अतिथी म्हणून प्रधान मुख्य वनसंरक्षक (उत्पादन व व्यवस्थापन) ए. एस. के. सिन्हा, प्रधान मुख्य वनसंरक्षक व व्यवस्थापकीय संचालक सुरेश गैरोला, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (कॅम्पा) एस. एच. पाटील, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (प्रशासन दुय्यम संवर्ग) डॉ. दिलीप सिंह, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (कार्मिक) ए. के. मिश्रा, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संरक्षण) के. एन. खवारे, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव व्यवस्थापन) सुनिता सिंह, मुख्य वनसंरक्षक (मानव संसाधन) यशवीर सिंह व मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) टी. एस. के. रेड्डी उपस्थित होते. यावेळी वन विभाग आणि जेसीआय नाग विदर्भ यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात अनेक वरिष्ठ वन अधिकाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.
भारतीय इतिहासानुसार ११ सप्टेंबर १९३८ या दिवशी खेजरली गावातील बिष्णोई समुदायातील ३६३ व्यक्तींनी खेडजी या वृक्षाच्या संरक्षणासाठी बलिदान दिले होते. तेव्हापासून हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो. तसेच महाराष्ट्र राज्यात सुध्दा वनविभागातील २५ वनाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वनसंरक्षाची जबाबदारी पार पाडतांना जीवाचे बलिदान दिले. त्यांच्या या बलिदानाच्या स्मरणार्थ वनविभागाच्यावतीने नागपुरातील वनभवन येथे वनहुतात्मा स्मारक उभारण्यात आले आहे. रविवारी या स्मारकावर पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. (प्रतिनिधी)