सदन यादव यांना अटकपूर्व जामीन नाकारला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:11 AM2021-09-07T04:11:33+5:302021-09-07T04:11:33+5:30
नागपूर : रचना सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष सदन नारायण यादव यांनी फसवणूक प्रकरणात जामीन मिळविण्यासाठी दाखल केलेला अर्ज मुंबई ...
नागपूर : रचना सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष सदन नारायण यादव यांनी फसवणूक प्रकरणात जामीन मिळविण्यासाठी दाखल केलेला अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळून लावला. न्यायमूर्ती विनय जोशी यांनी हा निर्णय दिला.
या प्रकरणात राजेश काचोरे यांनी सोनेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून २ फेब्रुवारी २०२१ रोजी यादव व इतर आरोपींविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात आला आहे. रचना संस्थेने काचोरे कुटुंबाची मौजा सोमलवाडा येथील ७.३५ एकर जमीन १ लाख ४९ हजार रुपये एकर दराने खरेदी करण्यासाठी २० एप्रिल १९८७ रोजी करार केला होता. करारानुसार जमिनीची संपूर्ण रक्कम दोन वर्षांत अदा करायची होती. संस्थेला संबंधित रक्कम वेळेवर देण्यात अपयश आल्यामुळे ६ एप्रिल १९८९ रोजी सुधारित करार करण्यात आला होता. संस्थेने त्या कराराचेही पालन केले नाही. त्यामुळे करार रद्द झाला होता. त्यानंतर काचोरे यांनी संस्थेकडून घेतलेल्या रकमेच्या मोबदल्यात केवळ एक एकर जमिनीचे विक्रीपत्र करून दिले. असे असताना संस्थेने संपूर्ण जमिनीवर ले-आऊट टाकून तेथील भूखंड अनेकांना विकले असा आरोप आहे. काचोरे यांच्यातर्फे ॲड. प्रकाश नायडू यांनी कामकाज पाहिले.