सदानंद फुलझेले हे बाबासाहेबांचे सच्चे अनुयायी
By Admin | Published: October 19, 2015 03:09 AM2015-10-19T03:09:36+5:302015-10-19T03:09:36+5:30
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपुरात बौद्ध धम्माची दीक्षा घेतली.
देवेंद्र फडणवीस : मारवाडी फाऊंडेशनचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार प्रदान
नागपूर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपुरात बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्या ऐतिहासिक धम्मदीक्षा सोहळ्याची संपूर्ण जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणारे सदानंद फुलझेले हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सच्चे अनुयायी आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.
दीक्षाभूमी येथील डॉ. आंबेडकर स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले यांना मारवाडी फाऊंडेशनतर्फे दिला जाणारा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार रविवारी मुख्यमंत्र्यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व पाच लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या खुल्या रंगमंचावर आयोजित या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे होते. तर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी हे प्रमुख अतिथी होते. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, मारवाडी फाऊंडेशनचे अध्यक्ष खासदार अजय संचेती, माजी खासदार दत्ता मेघे, माजी खासदार बनवारीलाल पुरोहित, मारवाडी फाऊंडेशनचे संस्थापक गिरीश गांधी व्यासपीठावर होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सदानंद फुलझेले यांना आम्ही लहानपणापासूनच ओळखतो. त्यांनी आपले संपूर्ण जीवन दीक्षाभूमीसाठी समर्पित केले. दीक्षाभूमी येथील डॉ. आंबेडकर महाविद्यालय आज विदर्भात प्रथम क्रमांकाचे महाविद्यालय म्हणून ओळखले जाते, ते केवळ सदानंद फुलझेले यांच्या कर्तृत्वामुळे. त्यांनी गुणवत्तेला नेहमीच प्राधान्य दिले. दिवंगत दादासाहेब गवई हे दीक्षाभूमीचा चेहरा होते. तर पाठीमागे संपूर्ण जबाबदारी समर्थपणे सांभाळणारे सदानंद फुलझेले होत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नितीन गडकरी यांनीसुद्धा दिवंगत रा. सू. गवई आणि सदानंद फुलझेले यांनी दीक्षाभूमीवर केलेल कार्य हे जागतिक स्वरूपाचे असल्याचे सांगितले. बनवारीलाल पुरोहित आणि दत्ता मेघे यांनीही यावेळी विचार व्यक्त करीत फुलझेले यांच्या कार्याचा गौरव केला.
सुशीलकुमार शिंदे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये दलितेतरही मोठ्या संख्येने कार्यरत होते. डॉ. आंबेडकरांनी सर्वंकष दलित चळवळीची भूमिका मांडली होती. तशी सर्वंकष चळवळ उभी राहण्याची गरज आहे. त्यामुळे आपसातील भांडणही दूर होतील. ही केवळ राजकीय गरज नसून ती सामाजिक भूमिकेसाठी अतिशय महत्त्वाची बाब असल्याचेही शिंदे यांनी स्पष्ट केले. खा. अजय संचेती यांनी प्रास्ताविक केले.
संचालन बाळ कुलकर्णी यांनी केले. अतुल कोटेचा यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)
पुरस्काराची रक्कम दीक्षाभूमीला दान
सदानंद फुलझेले यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना या पुरस्कारामुळे माझ्यावरील जबाबदारी आणखी वाढली असल्याचे सांगितले. १९५२ मध्ये पहिल्यांदा निवडणूक लढलो आणि एका मताने जिंकलो. त्यामुळे १९५६ मध्ये मला उपमहापौर बनता आले. उपमहापौर असल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ऐतिहासिक धम्मदीक्षा सोहळ्याची जबाबदारी माझ्यावर सोपविली. ती यशस्वीपणे पार पाडू शकलो. तेव्हापासून दीक्षाभूमीची प्रामाणिकपणे सेवा करीत आहे. या सेवेसाठीच मला हा पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे या पुरस्कारापोटी मिळालेली पाच लाख रुपयांची रक्कम मी दीक्षाभूमीला दान करीत असल्याचे फुलझेले यांनी जाहीर केले.
जलयुक्त शिवारसाठी ११ लाखांचा धनादेश
याप्रसंगी मारवाडी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गिरीश गांधी यांनी जलयुक्त शिवार अभियानाचे कौतुक करीत या अभियानासाठी फाऊंडेशनच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ११ लाख रुपयांचा धनादेश प्रदान केला.