नागपुरातील सदर भागात सदरमध्ये दारुड्याचा हैदोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 09:57 PM2018-03-06T21:57:57+5:302018-03-06T21:58:12+5:30
वर्दळीच्या भागात हैदोस घालून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका दारुड्याला पकडून संतप्त जमावाने त्याची बेदम धुलाई केली. नंतर त्याला पोलिसांच्या हवाली केले. सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेने काही वेळ वाहनधारकांची चांगलीच भंबेरी उडवली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वर्दळीच्या भागात हैदोस घालून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका दारुड्याला पकडून संतप्त जमावाने त्याची बेदम धुलाई केली. नंतर त्याला पोलिसांच्या हवाली केले. सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेने काही वेळ वाहनधारकांची चांगलीच भंबेरी उडवली होती.
दारूच्या नशेत तर्र असलेला एक तरुण हातात दगड घेऊन दुपारी १ ते २ च्या दरम्यान सदरमधील एसएफएस चर्च ते अदनान बिल्डिंग मार्गावर अक्षरश: हैदोस घालत होता. तो नजरेस पडणाऱ्या वाहनचालकांकडे दगड घेऊन धावत होता. कारसह अन्य वाहनांच्या काचेवर दगड मारत होता. त्यामुळे या मार्गावर एकच गोंधळ निर्माण झाला होता. त्याने दगड मारू नये म्हणून प्रत्येकजण स्वत:ला आणि आपले वाहन वाचविण्यासाठी धावपळ करीत होता. अशाच प्रकारे सिलिंडर पोहचविणारा इम्रान नामक तरुण आपल्या सहकाऱ्यांसह या भागात वाहन घेऊन आला. त्याच्यावर नजर पडताच दारुड्या आरोपीने दगड घेऊन त्याच्याकडे धाव घेतली. त्याने भलामोठा दगड सिलिंडर पोहचविणाऱ्या वाहनाच्या काचेवर मारला. दुसरा दगड घेऊन तो इम्रानवर धावला. त्याचा हैदोस पाहून एकत्रित झालेल्या जमावाने त्याला घेरले आणि पकडून त्याची बेदम धुलाई केली. त्यानंतर सदर पोलिसांना माहिती दिली. पोलीस पोहचले तेव्हा जमावाने दारुड्या तरुणाला पोलिसाच्या हवाली केले. पोलिसांनी हैदोस घालणाऱ्या दारुड्याला ताब्यात घेतले. मात्र, त्याच्याविरुद्ध कुणीही तक्रार द्यायला तयार नव्हते. ज्या वाहनांच्या काचा आरोपीने फोडल्या त्यांनी पोलिसांचे लचांड नको म्हणून तेथून काढता पाय घेतला.
धुलाईनंतर उतरली नशा
दरम्यान, नागरिकांनी चोप दिल्यानंतर हैदोस घालणाऱ्या दारूड्याची नशा उतरली. तो तामिळ-तेलगू सारख्या भाषेत बरळू लागला. तो काय बोलतो, हे कुणाच्याही लक्षात येत नव्हते. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. मात्र, वृत्त लिहिस्तोवर त्याचे नाव, पत्ता स्पष्ट झाला नव्हता.