सदर पोलीस ठाण्यात स्फोट

By admin | Published: May 27, 2017 02:37 AM2017-05-27T02:37:03+5:302017-05-27T02:37:03+5:30

सदर पोलीस ठाण्यात आज दुपारी २.१६ वाजता स्फोट झाल्याने उपराजधानीत प्रचंड खळबळ उडाली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Sadar police station explosion | सदर पोलीस ठाण्यात स्फोट

सदर पोलीस ठाण्यात स्फोट

Next

उपराजधानीत खळबळ पोलीस प्रशासनाची धावपळ पत्नी पीडिताचे कृत्य

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सदर पोलीस ठाण्यात आज दुपारी २.१६ वाजता स्फोट झाल्याने उपराजधानीत प्रचंड खळबळ उडाली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त उपराजधानीत देशभरातील महत्त्वाच्या, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची मांदियाळी जमणार असताना ही घटना घडल्याने पोलीस प्रशासनाची प्रचंड तारांबळ उडाली होती. मात्र, हा स्फोट घडवून आणलेल्या आरोपीने स्वत:चे नाव चिठ्ठीत लिहून ठेवल्याने अवघ्या दोन तासातच पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर कुटुंबं कलहामुळे तो मानसिक रुग्ण झाल्याचे
आणि या अवस्थेतूनच त्याने हा स्फोट घडवून आणल्याचे स्पष्ट झाल्यामुळे उलटसुलट चर्चेला विराम मिळाला.
शहरातील अतिमहत्त्वाचा परिसर म्हणून ओळख असलेल्या सिव्हिल लाईन्समध्ये मेट्रो रेल्वेचे मुख्य कार्यालय, विशेष पोलीस महानिरीक्षकांचे कार्यालय आहे. येथून हाकेच्या अंतरावर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक कार्यालय, न्यायालय, उद्योग भवन, प्रशासकीय भवन, गुन्हे शाखा आणि अन्य अनेक महत्त्वाची कार्यालये आहेत. अशा या महत्त्वाच्या कार्यालयाजवळ सदर पोलीस ठाणे आहे. स्मार्ट पोलीस ठाण्याच्या संकल्पनेनुसार सदर ठाण्यात विविध प्रकारची कामे सुरू आहेत. येथे काम करणारे मुकेश निंबर्ते, अविनाश चौधरी आणि प्रतीक भेदे नामक मजूर पोलीस ठाण्याच्या दर्शनी भागातील (उजवीकडे) हिरवळीवर शुक्रवारी दुपारी २.१५ वाजता जेवण करायला बसले. त्यांनी आपले टिफीन उघडले असतानाच अचानक २.१६ वाजता जोरदार स्फोट झाला. त्यामुळे हादरलेल्या या तिघांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. दरम्यान, स्फोटाचा जोरदार आवाज ऐकून पोलीस ठाण्यातील मंडळी धावतच बाहेर आली. ज्या ठिकाणी स्फोट झाला. त्या ठिकाणी छोटा खड्डा पडला. बाकड्याचा काही भाग तुटला आणि कंपाऊंड वॉलच्या पिलरला खड्डा पडला. बाजूची झाडेही काळपट पडली. पोलीस ठाण्याच्या आवारात स्फोट झाल्याच्या वृत्ताने पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली. ठाणेदार सुनील बोंडे यांनी या प्रकाराची माहिती कळविताच बॉम्बशोधक व नाशक पथक श्वानासह घटनास्थळी पोहचले. त्यांच्या पाठोपाठ दहशतवाद विरोधी पथकाचे सहायक पोलीस आयुक्त महेश सवई, सहायक आयुक्त सोमनाथ वाघचौरे आपापल्या ताफ्यासह सदर ठाण्यात पोहचले. पाठोपाठ गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम, परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, अतिरिक्त आयुक्त श्यामराव दिघावकर, सहपोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे यांनीही धाव घेतली.
स्फोट कसा झाला, का झाला, कुणी केला, त्याची चौकशी सुरू झाली. स्फोट ज्या ठिकाणी घडला, त्या ठिकाणाहून सुमारे ८ ते १० फूट अंतरावर पोलिसांना दोन चिठ्ठ्या आढळल्या. तीत स्फोट घडवून आणणारा आरोपी मुकेश अंभोरे याने स्वत:चे नावही लिहिले होते. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्या प्रतापनगरातील घरी जाऊन त्याला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

यापूर्वी बार रूममध्ये स्फोट
आरोपीने बिसलरीच्या बाटलीत सुतळी बॉम्बमध्ये वापरली जाणारी बारूद भरून नोझलच्या आधारे पॅकिंग करून सदर ठाण्यात हा स्फोट घडवून आणला. आरोपी मुकेश अंभोरे याने २०१० मध्ये जिल्हा न्यायालयाच्या आवारात असलेल्या वकिलांच्या कक्षात (बार रूम) टायमरच्या साह्याने स्फोट घडवून आणला होता. त्याला पकडून पोलिसांनी सदर ठाण्यात आणताच मुकेश अनियंत्रित झाला. तो पोलिसांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करू लागला. बळाचा वापर करीत त्याला पोलिसांनी कसेबसे नियंत्रित केले.

स्फोटाची चौकशी सुरू
स्फोटाच्या घटनाक्रमाची माहिती देताना सहपोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे यांनी पत्रकारांना सांगितले की, आरोपी कुटुंब कलहामुळे त्रस्त झाला आहे. त्यातून तो मनोरुग्णासारखा वागतो. नेहमी इकडेतिकडे फिरत राहतो. त्याने हे कृत्य केल्याचे जवळपास स्पष्ट झाले असले तरी आम्ही चौकशीचे सर्व पर्याय तपासत असल्याचेही ते म्हणाले. या स्फोटाची चौकशी सुरू असून, काळजीचे कुठलेही कारण नसल्याचे ते म्हणाले.

Web Title: Sadar police station explosion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.