लाेखंडी साहित्याचा आधी साैदा, नंतर चाेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:07 AM2021-07-21T04:07:54+5:302021-07-21T04:07:54+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क हिंगणा : चाेरट्यांनी भूखंडावर पडून असलेले लाेखंडी साहित्य हेरून त्याचा आधी कबाडी व्यापाऱ्याशी साैदा केला. त्यानंतर ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
हिंगणा : चाेरट्यांनी भूखंडावर पडून असलेले लाेखंडी साहित्य हेरून त्याचा आधी कबाडी व्यापाऱ्याशी साैदा केला. त्यानंतर ते साहित्य ट्रकमध्ये भरून चाेरून नेले. मात्र, पाचही चाेरटे पाेलिसांच्या जाळ्यात अडकले आणि पाेलिसांनी त्यांच्याकडून एकूण ६ लाख ७३ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही घटना हिंगणा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील जामठा शिवारात बुधवार (दि. १४) ते शनिवार (दि. १७) दरम्यान घडली.
अटक करण्यात आलेल्या चाेरट्यांमध्ये अमित हरिश्चंद्र गाेडबाेले (३३, रा. लाेधी पांजरी, ता. नागपूर ग्रामीण), विजय बकाराम माेरे (४१, रा. तुकाराम नगर, कळमना, नागपूर), साेनू दामाेदर शिंदे (३४, रा. मिनी मातानगर, भंडारा राेड, नागपूर), विजय प्रकाश लिल्हारे (३५, रा. मिनी मातानगर, भंडारा राेड, नागपूर) व किसन शंकरलाल पालिवार (५४, रा. तलमले ले-आऊट, गुलमाेहर नगर, भंडारा राेड, नागपूर) यांचा समावेश आहे. संदीप वाचासुंदर, रा. नागपूर हे बांधकाम व्यावसायिक असून, त्यांचा नागपूर-बुटीबाेरी महामार्गालगत जामठा (ता. हिंगणा) येथे भूखंड आहे. त्या भूखंडावर लाेखंडी व बीडचे पाईप, लाेखंडी चॅनल व इतर साहित्य ठेवले आहे.
या साहित्यावर अमित गाेडबाेलेची नजर हाेती. त्याने साेनू शिंदेशी संपर्क साधून भूखंडावरील साहित्य विकायचे असल्याची बतावणी केली. विजय माेरे या व्यापाऱ्याने हे साहित्य ९२ हजार रुपयांमध्ये खरेदी करणार असल्याचे त्या दाेघांना सांगितले. त्यामुळे अमित व त्याच्या साथीदारांनी एमएच-३१/सीबी-४०९१ क्रमांकाचा ट्रक तिथे नेला आणि त्यात लाेखंडी साहित्य भरून नेत विजय माेरेला विकले. यातून मिळालेली रक्कम पाचही जणांनी आपसात वाटून घेतली.
चाेरी झाल्याचे लक्षात येताच ऋषी राजेंद्र यादव (३०, रा. गुरुप्रसाद नगर, दत्तवाडी) यांनी पाेलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी हिंगणा पाेलिसांनी भादंवि ३७९ अन्वये गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. या चाेरीत अमित सहभागी असल्याचे कळताच पाेलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याने चाेरीची कबुली देत साथीदारांची नावे सांगितल्याने पाेलिसांनी सर्वांना अटक केली आणि त्यांच्याकडून एकूण ६ लाख ७३ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पाेलीस उपायुक्त नरूल हसन, सहायक पाेलीस आयुक्त पी. एस. कार्यकर्ते यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सारीन दुर्गे, सहायक पाेलीस निरीक्षक जीवन भातकुले, विनाेद कांबळे, साेमेश वर्धे, विक्रांत देशमुख, सचिन श्रीपाद यांच्या पथकाने केली.
...
चाेरीचे साहित्य जप्त
चाेरट्यांना अटक करताच त्यांच्याकडून १ लाख ५० हजार रुपये किमतीचे १० नग लाेखंडी पाईपचे तुकडे, त्यांनी व्यापारी विजय माेरेकडून घेतलेल्या ९४ हजार रुपयांपैकी २३ हजार ७०० रुपये राेख, साहित्य वाहून नेण्यासाठी वापरण्यात आलेला पाच लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण ६ लाख ७३ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती ठाणेदार सारीन दुर्गे यांनी दिली. त्यांच्याकडून चाेरीच्या इतर घटना उघड हाेण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.