सुरक्षित रक्ताची हमी असावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 12:21 AM2017-09-16T00:21:04+5:302017-09-16T00:21:53+5:30
‘सुरक्षित रक्त व रक्त घटक पुरविणे’ हे प्रत्येक रक्तपेढीचे ब्रीद आहे. रक्त व रक्त घटकांच्या सुरक्षेसंदर्भातील पूर्णत: स्वयंचलित असलेली उपकरणे उपलब्ध आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘सुरक्षित रक्त व रक्त घटक पुरविणे’ हे प्रत्येक रक्तपेढीचे ब्रीद आहे. रक्त व रक्त घटकांच्या सुरक्षेसंदर्भातील पूर्णत: स्वयंचलित असलेली उपकरणे उपलब्ध आहेत. परंतु रक्तपेढी ते रुग्णाला रक्त लावेपर्यंतची जी सुरक्षा आहे, त्याची हमी परिचारिकेपासून ते डॉक्टरांपर्यंत प्रत्येकाने घ्यायला हवी, असे प्रतिपादन मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी येथे केले.
अन्न व औषध प्रशासन, नागपूर विभाग व इंडियन सोसायटी आॅफ ट्रान्सफ्यूजन मेडिसीन अॅण्ड ब्लड बँक फेडरेशन नागपूरच्या संयुक्त विद्यमाने ‘सुरक्षित रक्त व रक्त घटक पुरविणे’ या संकल्पनेवर आधारित ‘ट्रान्समीट-२०१७’ कार्यशाळेचे आयोजन मेडिकलमध्ये करण्यात आले. याच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. व्यासपीठावर डेप्युटी ड्रग कंट्रोलर (मुंबई) डॉ. के. बंगारुराजन, राज्य रक्त संक्रमण परिषदेचे माजी सहसंचालक डॉ. संजयकुमार जाधव, औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त डॉ. मोहन केकतपुरे, डॉ. डी. एस. कुंभलकर, डॉ. संजय पराते उपस्थित होते. डॉ. निसवाडे म्हणाले, डॉक्टरांनी रक्ताचे प्रिस्क्रिप्शन देताना काळजी घ्यायला हवी. रुग्णाला किती रक्त हवे, कोणते हवे आहे याचा अभ्यास करून तसे प्रिस्क्रिप्शन द्यायला हवे.
शासकीय रक्तपेढ्यांचा विकास होणे गरजेचे
डॉ. संजयकुमार जाधव म्हणाले, प्रगत देशांमध्ये रक्तपेढींचे ‘केंद्रीकरण’ करण्यात आले आहे. यामुळे तिथे रक्ताच्या गुणवत्तेपासून ते इतर सोयी पुरविण्यात अडचणी येत नाही. या उलट आपल्याकडे रक्तपेढीचे ‘विकेंद्रीकरण’ झाले आहे. यामुळे मनुष्यबळापासून ते रक्तांच्या तुटवड्यापर्यंत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यावर उपाय म्हणून शासनाने शासकीय रक्तपेढ्यांचा विकास करायला हवा. या रक्तपेढ्यांना प्रादेशिक दर्जा मिळायला हवा.
रॅपीड टेस्ट टाळा
डॉ. के. बंगारुराजन यांनी, रक्तपेढीला लागणारी जागा, उपकरणे, कायदा आदींची माहिती दिली. ते म्हणाले, रक्तपेढ्यांनी रक्ताच्या गुणवत्तेला घेऊन नेहमीच जागरुक रहावे. विशेषत: वेळ कमी असल्याचे कारण देऊन रक्ताची ‘रॅपीड टेस्ट’ करू नये. कारण त्याचे रिझल्ट योग्य येत नाही. कागदोपत्री पुरवा राहात नाही. यामुळे नियमानुसार ‘एलायझा’ चाचणीच करावी. यावेळी डॉ. राजाध्यक्ष यांनी रक्तपेढीत घ्यावयाची दक्षता यावर मार्गदर्शन केले. संचालन डॉ. कीर्ती जयस्वाल व डॉ. सुखनिक खुराणा यांनी केले तर आभार डॉ. शीला मुंधडा यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी डॉ. व्ही.आर. रवी, डॉ. हरीश वरभे, अशोक पत्की आदींनी सहकार्य केले.