नागपुरातील पहिल्या पॉझिटिव्ह महिलेची सुरक्षित प्रसूती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2020 08:27 PM2020-05-03T20:27:20+5:302020-05-03T20:27:42+5:30
मेडिकलच्या कोविड हॉस्पिटलमध्ये नागपुरातील पहिल्या पॉझिटिव्ह महिलेची सुरक्षित प्रसूती करण्यात आली. स्त्रीरोग व प्रसूती विभागाचे डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत ‘नॉर्मल’ प्रसूती केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मेडिकलच्या कोविड हॉस्पिटलमध्ये नागपुरातील पहिल्या पॉझिटिव्ह महिलेची सुरक्षित प्रसूती करण्यात आली. स्त्रीरोग व प्रसूती विभागाचे डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत ‘नॉर्मल’ प्रसूती केली. या महिलेने गोंडस बाळाला जन्म दिला. कोविड हॉस्पिटलमध्ये अशा रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला आहे. सतरंजीपुºयातील कोरोनाबाधित मृताच्या शेजारी राहणाºया २९ वर्षीय गर्भवतीसह तिच्या कुटुंबातील सात जणांना १६ एप्रिल रोजी आमदार निवासातील अलगीकरण कक्षात दाखल केले होते. याच दिवशी या सर्वांचे नमुने घेण्यात आले. १९ एप्रिल रोजी गर्भवतीसह तिच्या पतीचा नमुना पॉझिटिव्ह आला. या दोघांना मेडिकलमध्ये दाखल केले. गर्भवती महिलेची विशेष काळजी घेतली जात होती. विशेष म्हणजे, सात दिवसानंतर तिच्या घशातील द्रव्याचा नमुना घेऊन तपासले असता तो निगेटिव्ह आला. दहा दिवसानंतर पुन्हा नमुने तपासण्यात आले असता तोसुद्धा निगेटिव्ह आला. तरीही प्रतिबंधात्मक उपाय करून आज रविवारी तिची प्रसूती करण्यात आली. नॉर्मल प्रसूती होऊन तिने मुलाला जन्म दिला. मुलाची आणि त्याच्या आईची प्रकृती उत्तम असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. ४८ तासानंतर जन्मलेल्या बाळाचे नमुने तपासले जाणार असल्याचे डॉ. राजुता फुके यांनी सांगितले. ही प्रसूती मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्या मार्गदर्शनात स्त्रीरोग व प्रसूती विभागाच्या प्रमुख डॉ. मंजुश्री वाईकर, सहयोगी प्राध्यापक डॉ. राजुता फुके, वरिष्ठ निवासी डॉक्टर डॉ. भारत भूषण, कनिष्ठ निवासी डॉक्टर डॉ. शुभांगी फुटाणे यांनी केली. वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांचे विशेष सहकार्य लाभले.
त्या तान्हुलीचा नमुना निगेटिव्ह
२९ एप्रिल रोजी मेयोमध्ये प्रसूती झाल्यानंतर त्या मातेचा नमुना पॉझिटिव्ह आला. या घटनेने खळबळ उडाली होती. सुरक्षा साधने घालूनच डॉक्टरांनी ही प्रसूती केली होती. प्रसूतीनंतर मातेपासून काही अंतरावर नवजात तान्हुलीला ठेवण्यात आले. बाळाला वेळोवेळी मातेचे दूध दिले जात होते. दरम्यान तान्हुलीला आईपासून दूर ठेवण्यात आले. मातेचे दूध एका वाटीत काढून चमच्याने तिला पाजले जात आहे. चार दिवसानंतर म्हणजे शनिवारी त्या तान्हुलीचा नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला. आज अहवाल निगेटिव्ह आल्याने तिच्या आईसह डॉक्टरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.