सफेलकरसह त्याच्या गुंडांना पोलिसांनी केली पुन्हा अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:10 AM2021-04-23T04:10:25+5:302021-04-23T04:10:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - एका प्रकरणात पीसीआर संपताच गुन्हे शाखेच्या पथकाने गँगस्टर रणजित सफेलकरला दुसऱ्या एका गुन्ह्यात अटक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - एका प्रकरणात पीसीआर संपताच गुन्हे शाखेच्या पथकाने गँगस्टर रणजित सफेलकरला दुसऱ्या एका गुन्ह्यात अटक केली. तर, कारागृहात बंद असलेल्या त्याच्या टोळीतील कालू आणि भरत हाटे तसेच हेमंत गोरखा ऊर्फ नेमाली या गुंडांनाही पोलिसांनी अटक केली. या सर्वांना समोरासमोर विचारपूस करून त्यांनी दिलेल्या माहितीचा खरेखोटेपणा पोलीस आता तपासणार आहेत.
पोलिसांसाठी आव्हान ठरलेल्या मनीष श्रीवास हत्याकांडाचा छडा लावून पोलिसांनी आधी रणजित सफेलकरच्या टोळीतील गुंड आणि त्याचे उजवे डावे हात म्हणून कुख्यात असलेले हाटे बंधू तसेच हेमंत गोरखाला पोलिसांनी अटक केली. त्यांचा पीसीआर सुरू असतानाच सफेलकरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. नंतर बाथो पोलिसांच्या हाती लागला. त्यामुळे या सर्वांची पोलिसांनी वेगवेगळी चाैकशी केली. त्यांच्या चाैकशीतून विशाल पैसाडेलीची हत्या करून त्याला आरोपी सफेलकरने अपघाताचे स्वरूप दिले होते, हेही उघड झाले. याच दरम्यान असे अनेक गुन्हे उघड होतानाच मोक्कासह डुमण प्रगट नामक व्यक्तीच्या जमिनीवर कब्जा करून ५० लाखांची खंडणी उकळण्याचाही गुन्हा पोलिसांनी सफेलकर टोळीवर दाखल केला. मोक्काच्या गुन्ह्यात सफेलकरच्या पीसीआरची मुदत गुरुवारी सफल्यामुळे त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालय त्याला एमसीआर (ज्युडिशिअल कस्टडी) देणार हे स्पष्ट होते. त्यामुळे पोलिसांनी सफेलकरला ५० लाखांच्या खंडणीत अटक केली. सोबतच हाटे बंधू आणि हेमंत गोरखाला मनीष श्रीवास हत्याकांडात लावलेल्या मोक्काच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली.
---
दिशाभूल करण्याचा प्रयत्न
पोलिसांच्या कोठडीत आतापर्यंत आरोपी सफेलकर आणि त्याच्या गुंडांनी बऱ्याच गुन्ह्यांची माहिती दिली असली तरी फायरिंग आणि अन्य काही गुन्ह्यांत विसंगत माहिती दिली आहे. त्यामुळे पोलीस आता समोरासमोर चाैकशी करून सफेलकर तसेच त्याच्या टोळीतील गुंडांना क्रॉस चेक करणार आहेत.
---