साहिल सय्यदला दोन दिवसांचा पीसीआर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 12:29 AM2020-07-25T00:29:50+5:302020-07-25T00:31:26+5:30
अनेकांच्या मालमत्ता हडपणारा कुख्यात गुन्हेगार साहिल सय्यद याला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. गुन्हे शाखेच्या पथकाने बजाजनगरात दाखल असलेल्या गुन्ह्यात त्याला गुरुवारी कारागृहातून ताब्यात घेतले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अनेकांच्या मालमत्ता हडपणारा कुख्यात गुन्हेगार साहिल सय्यद याला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
गुन्हे शाखेच्या पथकाने बजाजनगरात दाखल असलेल्या गुन्ह्यात त्याला गुरुवारी कारागृहातून ताब्यात घेतले होते. सदानंद बनसोड यांची सुरेन्द्रनगरमध्ये दुमजली इमारत आहे. सुमारे तीन कोटी रुपये किंमत असलेल्या या इमारतीचे बक्षीसपत्र वृद्ध बनसोड यांनी मृत्यूपूर्वी त्यांची सेवा करणारे (भाडेकरू) डॉ. शशांक चौधरी यांच्या नावे केले होते. आरोपी साहिल सय्यद, संदीप बनसोड आणि गिरीश गिरधर तसेच त्यांच्या दोन साथीदारांनी शशांक चौधरी यांना मारहाण करून पिस्तुलाच्या धाकावर त्यांचे अपहरण केले आणि त्यांना कोर्टात नेऊन त्यांच्याकडून जबरदस्तीने सह्या घेतल्या. यानंतर त्यांना जिवे मारण्याची धमकी देऊन पळवून लावले. चार वर्षांपूर्वी घडलेल्या या गुन्ह्याची तक्रार चौधरी यांनी बजाजनगर ठाण्यात नोंदविली होती. मात्र, राजकीय पाठबळ वापरून साहिलने हा गुन्हाच दाखल होऊ दिला नव्हता. दरम्यान, साहिलला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केल्याचे कळाल्यानंतर चौधरी यांनी गुन्हे शाखेत येऊन नव्याने आपली तक्रार नोंदवली. त्यामुळे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी साहिल तसेच संदीप बनसोड, गिरीश गिरीधर आणि दोन साथीदारांविरुद्ध बजाजनगर ठाण्यात गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यात पोलिसांनी साहिलला गुरुवारी प्रोडक्शन वारंटच्या आधारे अटक केली. त्याला तपास अधिकारी संतोष खांडेकर यांनी आज न्यायालयात हजर करून त्याचा दोन दिवसांचा पीसीआर मिळवला.
गुन्ह्यातील पिस्तूल आणि वाहन कुणाचे?
या गुन्ह्यात साहिल आणि साथीदारांनी शशांक चौधरी यांचे अपहरण करण्यासाठी जे वाहन वापरले ते वाहन कुणाचे आहे आणि चौधरी यांना आरोपींनी पिस्तूल लावले होते, ते पिस्तूल साहिलचे की आणखी कुणाचे, त्याचीही पोलीस चौकशी करीत आहेत.