हनी ट्रॅप - बोगस स्टिंग प्रकरण; साहिल सय्यद-नीलिमा जयस्वालचे डिजिटल पुरावे पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2020 10:23 AM2020-08-04T10:23:17+5:302020-08-04T10:23:38+5:30
अनेकांच्या मालमत्ता बळकावणारा कुख्यात गुन्हेगार साहिल सय्यद आणि त्याची मैत्रीण नीलिमा जयस्वाल तिवारी या दोघांच्या गुन्ह्याचा भरभक्कम पुरावा ठरू पाहणारे डिजिटल दस्तावेज पोलिसांच्या हाती लागले आहेत.
नरेश डोंगरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हनी ट्रॅप आणि बोगस स्टिंंग आॅपरेशन करून अनेकांना ब्लॅकमेल करणारा, अनेकांच्या मालमत्ता बळकावणारा कुख्यात गुन्हेगार साहिल सय्यद आणि त्याची मैत्रीण नीलिमा जयस्वाल तिवारी या दोघांच्या गुन्ह्याचा भरभक्कम पुरावा ठरू पाहणारे डिजिटल दस्तावेज पोलिसांच्या हाती लागले आहेत. १० पेन ड्राईव्ह आणि अनेक मोबाईलमध्ये साहिल, नीलिमा आणि त्यांच्या टोळीतील साथीदारांच्या गैरकृत्यांची, कट-कारस्थानांची आणि त्यांनी केलेल्या अनेक डील (व्यवहार)चीही यात माहिती असल्याचे समजते.
राजकारणाचा बुरखा ओढून आणि नेत्यांचे पाठबळ मिळवून अनेकांना ब्लॅकमेल करणाऱ्या साहिल आणि टोळीच्या कुकृत्याविरुद्ध १३ जुलैला पाचपावली पोलिस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल झाला. त्यानंतर आरोपी साहिल, त्याची मैत्रीण नीलिमा आणि साथीदार फरार झाले. साहिलला एका आठवड्यानंतर पोलिसांनी पकडले. तर तब्बल १७ दिवस पोलिसांना झुलविल्यानंतर ३१ जुलैला नीलिमा जयस्वाल तिवारी आणि साहिलचा भाऊ तौफिक या दोघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सावंगी (वर्धा)ला राशिद नामक व्यक्तीच्या सदनिकेतून ताब्यात घेतले.
या दोघांकडून पोलिसांनी १० पेन ड्राईव्ह आणि ६ मोबाईल जप्त केले. या दोन्हींची पोलिसांनी तपासणी केली असता त्यात साहिल, नीलिमा आणि त्याच्या टोळीतील साथीदारांनी अनेकांविरुद्ध रचलेल्या गुन्हेगारी कट कारस्थानांविषयीचे संभाषण तसेच षड्यंत्राची माहिती असल्याचे समजते. अनेक मालमत्तेसंदर्भातील कागदपत्रांच्या प्रती आणि त्यासंबंधी अनेकांसोबत त्यांनी केलेले संभाषण यातून पोलिसांच्या हाती लागले आहे. त्यांनी ज्यांना ब्लॅकमेल केले, त्याचाही पुरावा पेन ड्राईव्ह आणि मोबाईलमध्ये असल्याची सूत्रांची माहिती आहे.
‘ते’ गप्प बसल्यामुळेच हे निर्ढावले!
विशेष म्हणजे, ज्यांना साहिल-नीलिमा टोळीने ब्लॅकमेल केले, त्यांनी स्वत:ची इज्जत झाकून ठेवण्यासाठी मोठी डील केली. मात्र, पोलिसांकडे जाण्याचे टाळले. ते गप्प बसल्यामुळेच साहिल, नीलिमा आणि टोळी निर्ढावल्याचा निष्कर्ष यातून निघत असल्याचे एका अधिकाºयाचे मत आहे. प्रकरण तपासाधीन असल्यामुळे या संदर्भात उघड बोलता येणे शक्य नाही, असे नाव न छापण्याच्या अटीवर एका अधिकाºयाने सांगून उपरोक्त माहिती दिली.
साहिल-नीलिमाची अदलाबदली
पाचपावलीच्या गुन्ह्यातील पीसीआरची मुदत संपल्यामुळे नीलिमा जयस्वाल तिवारी हिची आज न्यायालयीन कस्टडीत अर्थात कारागृहात रवानगी करण्यात आली. दुसरीकडे कारागृहात असलेला साहिल याला गुन्हे शाखेच्या पथकाने आज ताब्यात घेतले. अलेक्सिस हॉस्पिटल ब्लॅकमेलिंग प्रकरणात त्याला अटक करण्यात आली आहे.