साहिलला दोन दिवसाची पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 12:18 AM2020-07-21T00:18:19+5:302020-07-21T00:19:37+5:30
रविवारी सायंकाळी पोलिसांनी जेरबंद केलेला गुन्हेगार साहिल ऊर्फ समीर खुर्शीद सय्यद याला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश सोमवारी न्यायालयाने दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रविवारी सायंकाळी पोलिसांनी जेरबंद केलेला गुन्हेगार साहिल ऊर्फ समीर खुर्शीद सय्यद याला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश सोमवारी न्यायालयाने दिले. १३ जुलैला पाचपावली पोलीस ठाण्यात साहिल आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध बनावट कागदपत्रे तयार करून वसुधा वासुदेव रुपदे या महिलेच्या घरावर कब्जा मारल्याचा तसेच रुपदे यांच्या मृत्यूपूर्वी त्यांच्याकडून हे घर विकत घेणाऱ्या रविशंकर सहारे यांना जिवे मारण्याची धमकी देऊन त्यांना हुसकावून लावण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून साहिल फरार झाला. त्यानंतर पुढच्या सहा दिवसात मानकापूर, तहसील आणि बजाजनगर ठाण्यातही साहिल आणि साथीदारांविरुद्ध गुन्हे दाखल झाले. दरम्यान, शोधाशोध करणाऱ्या पोलिसांना अखेर रविवारी साहिल हाती लागला. त्याला अटक करून सोमवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले.
पाचपावलीच्या गुन्ह्यात त्याने तयार केलेली बनावट कागदपत्रे जप्त करायची आहेत. या गुन्ह्यात त्याच्यासोबत असलेल्या साथीदारांचा शोध घ्यायचा आहे, त्यामुळे साहिलची पोलीस कोठडी मिळावी, अशी विनंती गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून करण्यात आली. ती मान्य करून न्यायालयाने साहिलला दोन दिवसाचा पीसीआर मंजूर केला.
मदतीला कुणीच नाही
गेल्या दोन-तीन वर्षांपासून साहिलभोवती त्याच्या गुंड साथीदारांचा आणि चमचेगिरी करणाऱ्यांचा नेहमी घोळका असायचा. तो कुठेही गेला तरी त्याच्यासोबत त्याचे आठ-दहा साथीदार असायचे. त्याला अटक करून आज न्यायालयात पोलिसांनी सादर केले तेव्हा त्याच्या अवतीभोवती त्याचा एकही साथीदार नव्हता.