साहित्य अकादमीने कायमच गाेमंतक लेखकांना डावलले; गाेव्याच्या महिला साहित्यिकांचा आराेप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 10:32 PM2023-04-22T22:32:10+5:302023-04-22T22:32:28+5:30
‘लाेकमत’ कार्यालयाला सदिच्छा भेट, चित्रपटात रंगविलेल्या वाईट प्रतिमेसारखे गाेवा नाहीच, गाेमंतक लेखिकांचे मत
निशांत वानखेडे
नागपूर : गाेव्यातील अनेक लेखकांनी मराठी भाषेत दर्जेदार लेखन करून मराठी साहित्यात माेलाची भर घातली आहे. त्यामुळे साहित्य अकादमीद्वारे गाेमंतक साहित्यिकांना पुरस्कृत केले जावे, कार्यक्रमात सन्मानाने आमंत्रित करावे, अशी अपेक्षा असते. मात्र, साहित्य अकादमीने कायमच गाेमंतक साहित्यिकांना डावलले आहे, अशी खंत गाेमंतक लेखिकांनी व्यक्त केली आहे.
मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठान, नागपूरतर्फे अकाेला येथे रविवारपासून दाेन दिवसीय पहिले विदर्भ लेखिका साहित्य संमेलनाचे आयाेजन करण्यात आले आहे. यामध्ये सहभागी हाेण्यास गाेव्याच्या विविध भागांतून लेखिका, कवयित्री, पत्रकार सहभागी झाले हाेते. यामध्ये चित्रा प्रकाश क्षीरसागर, प्रा. पाैर्णिमा राजेंद्र केरकर, कालिका राजेंद्र बापट, प्रा. सारिका आडविलकर, रजनी अरुण रायकर यांचा समावेश आहे. या साहित्यिकांनी शनिवारी ‘लाेकमत’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी संवाद साधताना या संमेलनाबाबत भावना व्यक्त केल्या. यानिमित्ताने विदर्भ आणि गाेव्यातील साहित्यिक आणि साहित्य संस्थांमध्ये सेतूबंध निर्माण हाेईल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. हे खास महिलांचे साहित्य संमेलन असल्याने ज्या महिलांना लिहावे वाटते, व्यक्त व्हावे वाटते, त्यांच्यासाठी ही संधी महत्त्वाची आहे. महिलांनी व्यक्त अन् माेकळे व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
पुरुषी राजकारणाने महिला साहित्यिकांना मागे ठेवले
महिलांना घर, संसार, मुलांचे संगाेपन, शिक्षण यांची बांधिलकी असते. नाेकरीपेशा महिलांची यात अधिक गैरसाेय हाेते. अशा परिस्थितीतही महिला लिहितात, व्यक्त हाेतात. ग्रामीण महिला तर वेगवेगळ्या समस्यांना ताेंड देत कणखरपणे साहित्यातून व्यक्त हाेतात, हे महत्त्वाचे आहे. अशा लेखिका, कवयित्रींना प्राेत्साहित करणे, सन्मानित करणे आवश्यक आहे. मात्र, इतर क्षेत्रांप्रमाणेच साहित्य क्षेत्रातही पुरुषी मक्तेदारीच्या राजकारणाने महिलांना नेहमी मागे टाकले जात असल्याची टीका या लेखिकांनी केली.
चित्रपटात रंगविलेल्या वाईट प्रतिमेसारखे गाेवा नाहीच
समुद्र किनाऱ्यावरचा गाेंधळ, देशी-विदेशी ललना, अश्लिलता, कॅसिनाे, मद्यपान, अशी गाेव्याची प्रतिमा चित्रपट आणि इतर माध्यमांनी निर्माण केली आहे. सरकारही पर्यटनाच्या नावावर महसूल मिळविण्याच्या नादात याच गाेष्टींना प्राेत्साहन देत आले आहे. मात्र, जशी प्रतिमा दाखविली आहे, तसे गाेवा आणि गाेमंतक नाहीच. मूळ गाेमंतकांना हे नकाे आहे. गाेव्याच्या प्रत्येक भागात निसर्गसाैंदर्य आहे. देवळे, चर्च, मशिदी एकत्रित आहेत, धार्मिक सलाेखा आहे. हा सुंदर, साेज्वळ गाेवा कधी प्रकाशात आणलाच जात नाही. परप्रांतातून आलेल्या लाेकांमुळे गाेव्याची प्रतिमा डागाळली आहे. ही प्रतिमा बदलण्याची गरज आहे, अशी भावना या लेखिकांनी व्यक्त केली.