साई आस्था फाउंडेशन कोरोना पीडितांचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:07 AM2021-06-04T04:07:37+5:302021-06-04T04:07:37+5:30
नागपूर : आठ वर्षांपासून गरजू नागरिकांना आवश्यक ती मदत करीत असलेली साई आस्था फाउंडेशन गेल्या वर्षीपासून कोरोना पीडितांचा आधार ...
नागपूर : आठ वर्षांपासून गरजू नागरिकांना आवश्यक ती मदत करीत असलेली साई आस्था फाउंडेशन गेल्या वर्षीपासून कोरोना पीडितांचा आधार झाली आहे. फाउंडेशनच्या वतीने कोरोना पीडितांना भोजन, ऑक्सिजन सिलिंडर, ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर, औषधे, रुग्णवाहिका इत्यादी सुविधा नि:शुल्क पुरवल्या जात आहेत. त्यामुळे पीडितांना दिलासा मिळत आहे.
अध्यक्ष आशिष नागपुरे यांनी समाजसेवेच्या उद्देशाने २०१३ मध्ये या फाउंडेशनची स्थापना केली. या फाउंडेशनने सध्या स्वत:ला कोरोना पीडितांच्या सेवेत झोकून दिले आहे. गेल्या वर्षी पहिल्या लॉकडाऊनमध्ये मजूर व इतर दुर्बल घटकातील नागरिकांचे प्रचंड हाल झाले. अशा नागरिकांना भोजन पुरवण्यासाठी फाउंडेशनने मानेवाडातील उल्हासनगरात कॉम्युनिटी किचन सुरू केले होते. तेथून रोज हजारो नागरिकांना तीन महिन्यांपर्यंत भोजन वितरित करण्यात आले. स्थलांतरित मजुरांना स्वगृही पोहोचविण्यासाठी आवश्यक मदत करण्यात आली. यावर्षी ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे शेकडो कोरोना रुग्णांना प्राण गमवावे लागले. फाउंडेशनने ही बाब लक्षात घेता ३५० ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर खरेदी केले आहेत. हे ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर गरजू रुग्णांना नि:शुल्क दिले जात आहेत. तसेच, त्यांना आवश्यक औषधे मिळवून देण्यासाठीही सहकार्य केले जात आहे. फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांमध्ये नागपुरे यांच्यासह प्रमोद मोहारकर, सतीश क्षीरसागर, नितीन आंबटकर, प्रणय म्हस्के आदींचा समावेश आहे.