उपोषणामुळे साईबाबाची प्रकृती खालावली, वकिलांचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2022 07:45 AM2022-05-28T07:45:00+5:302022-05-28T07:45:02+5:30
Nagpur News बेकायदा कारवाया प्रतिबंध कायद्यांतर्गत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेला नक्षल चळवळीचा मास्टर माईन्ड प्रा. जी. एन. साईबाबा याची उपोषणामुळे प्रकृती जास्त खालावली असल्याचा दावा, त्याच्या वकिलांनी केला आहे.
नागपूर : बेकायदा कारवाया प्रतिबंध कायद्यांतर्गत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेला नक्षल चळवळीचा मास्टर माईन्ड प्रा. जी. एन. साईबाबा याची उपोषणामुळे प्रकृती जास्त खालावली असल्याचा दावा, त्याच्या वकिलांनी केला आहे. तो कारागृह इस्पितळात दाखल असल्याचे वकिलांचे म्हणणे असून दुसरीकडे कारागृह प्रशासनाकडून मात्र प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
अंडा सेलसमोर लावलेला सीसीटीव्ही काढण्यात यावा या मागणीसाठी साईबाबाने २१ मे पासून उपोषण सुरू केले. २३ मे रोजी प्रकृती खराब झाली व २४ मे रोजी त्याने उपोषण सोडले. कारागृह प्रशासनाने पाणी पिण्यासाठी प्लास्टिकची बॉटल देण्याची मागणी मान्य केली. तर सीसीटीव्हीची दिशा बदलण्यात येईल, असे आश्वासन दिले. साईबाबा ९० टक्के दिव्यांग असून उपोषणामुळे प्रकृती खालावली असून त्याला दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती वकील ॲड.आकाश सोरदे यांनी दिली. सध्या नागपुरात फार जास्त तापमान असून अंडा सेलमध्ये आणखी गरमी होते. रात्रीच्या वेळी पाण्यासाठी कुणाला आवाज द्यायला लागू नये यासाठी पाण्याच्या बॉटलची मागणी केली होती, असेदेखील त्यांनी सांगितले. वाईड अँगल सीसीटीव्हीमुळे साईबाबाला कपडे बदलणे, आंघोळ करणे यासारख्या मूलभूत गोष्टी देखील करण्यात अडचण येत आहे. हे अधिकारांचे उल्लंघन आहे, असेदेखील ते म्हणाले.
उपचार योग्यच..
दरम्यान, साईबाबाची प्रकृती ठीक असून योग्य उपचार झाले असल्याचा दावा अधीक्षक अनुपकुमार कुमरे यांनी केला. साईबाबाने उपोषण वगैरे करण्याअगोदर प्रशासनाला कल्पना दिली नव्हती. नियमांचे पालन व्हावे व सुरक्षेच्या दृष्टीनेच सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले.