यालाच म्हणतात 'गेले कि हड्डी '
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 01:23 AM2020-01-29T01:23:02+5:302020-01-29T01:25:12+5:30
मांसाहार करीत असताना मांसाचे हाड अन्न नलिकेत जाऊन फसले.६० वर्षीय त्या इसमाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. खाणेपिणेही बंद झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मांसाहार करीत असताना मांसाचे हाड अन्न नलिकेत जाऊन फसले. ६० वर्षीय त्या इसमाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. खाणेपिणेही बंद झाले. काही खासगी इस्पितळात उपचार घेतले. एण्डोस्कोपीतून हाड बाहेर काढण्याचा प्रयत्नही झाला. परंतु यश आले नाही. दुसऱ्या एका खासगी इस्पितळाने यावरील उपचारासाठी एक लाख रुपयांपर्यंतचा खर्च सांगितला. परंतु एवढे पैसे नसल्याने अखेर मंगळवारी दुपारी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल गाठले. गॅस्ट्रोएण्ट्रोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांनी त्यांना तपासले. तातडीने एण्डोस्कोपी करण्याचा निर्णय घेतला. अनुभव व कौशल्याच्या बळावर पुढील तासभरात त्यांना अन्न नलिकेत फसलेले हाड बाहेर काढण्यात यश आले. रुग्णाला जीवनदान मिळाले.
एकनाथ पांडुरंग सहारे (६०) रा. रामनगर असे त्या रुग्णाचे नाव. प्राप्त माहितीनुसार, ते ३ जानेवारी रोजी मांसाहार करीत होते. नकळत मांसासोबत त्यांनी हाडही गिळले. हे हाड अन्न नलिकेत जाऊन फसले. पाणी, केळी खाऊनही त्याचा फायदा होत नसल्याचे पाहत नातेवाईकांनी एका खासगी इस्पितळात दाखल केले. डॉक्टरांनी प्रयत्न करूनही यश मिळाले नाही. त्याच डॉक्टरांनी एका गॅस्ट्रोएण्ट्रोलॉजी इस्पितळात पाठविले. येथील डॉक्टरांनी एण्डोस्कोपीद्वारे हाड काढण्याचा प्रयत्न केला. परंतु यश आले नाही. त्यांनीही दुसºया एका इस्पितळात पाठविले. त्या इस्पितळाने ७५ हजार ते १ लाखांचा खर्च सांगितला. सहारे हे व्यवसायाने स्कूलबस चालक आहेत. एवढा खर्च करणे त्यांना शक्य नव्हता. यामुळे २८ जानेवारी रोजी त्यांच्या नातेवाईकांनी मेडिकलशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी विभागात दाखल केले. विभाग प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांनी तपासून त्यांचा एक्स-रे काढला. एण्डोस्कोपी करण्याचा निर्णय घेतला. नातेवाईकांना याची माहिती दिली.
डॉ. गुुप्ता यांनी लोकमतला सांगितले, हाड बाहेर काढण्यासाठी पोट फाडून शस्त्रक्रिया करणे किंवा विना शस्त्रक्रिया एण्डोस्कोपीद्वारे हाड बाहेर काढणे हा पर्याय होता. पहिला प्रयत्न म्हणून एण्डोस्कोपीद्वारे हाड बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. परंतु आहारनलिकेत फसलेले हाड दोन्ही बाजूने टोकदार होते. यामुळे एण्डोस्कोपीद्वारे बाहेर काढताना अन्न नलिकेच्या इतर भागात व श्वास नलिकेत छिद्र होण्याची भीती होती. परंतु अनुभवाच्या बळावर व कौशल्याने पुढील तासभरात हाड बाहेर काढले. सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. श्वास नलिकेत कुठे छिद्र झाल्याचे दिसून येत नाही आहे. पुढील ४८ तास त्यांना रुग्णालयात ठेवले जाईल, असेही ते म्हणाले.
डॉ. गुप्ता यांना या प्रक्रियेत डॉ. हरीत कोठारी, डॉ. विनीत गुप्ता, बधीरीकरण तज्ज्ञ डॉ. रामटेके, तंत्रज्ञ सोनल गठ्ठेवार यांचे सहकार्य मिळाले. डॉ. गुप्ता यांनी आतापर्यंत एण्डोस्कोपीद्वारे पोटातून पेन्सील सेल, नाणे, खिळा बाहेर काढून रुग्णांना जीवनदान दिले आहे.