तब्बल १२० चित्रांतून ‘त्यांनी’ साकारला साईमहिमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 10:50 AM2018-01-29T10:50:20+5:302018-01-29T11:04:41+5:30
‘सब का मालिक एक’चा संदेश देणाऱ्या साईच्या महिमावर सर्वाधिक चित्र काढण्याचा त्यांना मान मिळाला आहे. त्यांचे चित्र प्रसिद्ध अभिनेता सलमान खान यांच्या रिसोर्टपासून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर लक्ष वेधून घेत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबईच्या फूटपाथवर हाताने शुभेच्छापत्र तयार करून विकणाऱ्या उमरेडच्या एका युवकाने स्वत:ची स्वतंत्र शैली विकसित केली आणि यातूनच शिर्डीच्या साईबाबांचे चरित्रच चित्रातून जिवंत केले. आतापर्यंत त्यांनी आठ बाय पाच फुटाची एकूण १२० चित्रे तयार केली आहेत. यात आणखी ३१ चित्रांची भर पडणार आहे. शिर्डीचे साईबाबा म्हणजे अनेकांचे आराध्य दैवत. अशा ‘सब का मालिक एक’चा संदेश देणाऱ्या साईच्या महिमावर सर्वाधिक चित्र काढण्याचा त्यांना मान मिळाला आहे. त्यांचे चित्र प्रसिद्ध अभिनेता सलमान खान यांच्या रिसोर्टपासून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर लक्ष वेधून घेत आहेत. सुनील शेगावकर असे या चित्रकाराचे नाव असून त्याचा उमरेड ते मुंबईपर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे.
नागपूर जिल्ह्यातील उमरेडसारख्या लहानशा गावात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील बाबुराव यांचा सोन्याचांदीचा व्यवसाय होता. परंतु ऐन उमेदीच्या काळात हा व्यवसाय डबघाईस आला. मोठा आर्थिक फटका बसला. सुनील रस्त्यावर आले. पडेल ते काम करून उदारनिर्वाह करू लागले. याच दरम्यान उमरेड येथील कलेचे शिक्षक विठ्ठल घोडे यांच्या ते संपर्कात आले आणि चित्रकलेची आवड निर्माण झाली. चित्रकलेचा विद्यार्थी आणि मित्र कौशल याने सुनील यांना चित्रकलेचे बारकावे शिकविले. मोठ्या कष्टाने ते चित्रकलेत पारंगत झाले. नागपुरात चित्रकलेला वाव नसल्याचे त्यांनी हेरले आणि थेट मुंबई गाठली. चर्चगेटच्या समोर बस्तान मांडले. मागणीनुसार हाताने काढलेल्या शुभेच्छा पत्रांची विक्री सुरू केली. पहिली कमाई ६० रुपयांची झाली. या कमाईने नवे बळ, नवी आशा मिळाली. कॉलेजच्या एका वसतिगृहात अनधिकृत म्हणून ते राहू लागले. तब्बल दीड वर्षे त्यांनी फूटपाथवर काढली. याच दरम्यान त्यांची भेट एका पत्रकाराशी झाली. प्रगती करायची असल्यास फूटपाथवर राहू नको, असा कानमंत्र त्याने दिला. त्या दिवसापासून फूटपाथ सोडला व पुणे गाठले. येथील कॉफी हाऊसमध्ये त्यावेळचे खासदार सुरेश कलमाडी यांची भेट घेऊन त्यांना चित्र दाखवली. त्यांनी लागलीच आपल्या मॅनेजरला फोन करून त्यांच्या हॉटेलमध्ये जागा उपलब्ध करून देण्यास सांगितले. त्या हॉटेलमध्ये बसून सुनील शुभेच्छा पत्र रंगवू लागले.
याच हॉटेलमध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्याशी भेट झाली. त्यांनी त्यांच्याकडून त्यांचा पहिला चित्रपट ‘आई’चे कार्ड तयार करून घेतले. त्यानंतर एक-एक काम मिळत गेले. पुण्यात आमदार जयंत ससाणे यांची ओळख झाली. त्यांनी विशेष कार्यअधिकारी भाऊसाहेब वाघचौरे यांनी ओळख करून दिली. वाघचौरे हे जेव्हा शिर्डी साईबाबा संस्थानचे अध्यक्ष झाले त्यांनी साईबाबांचे चरित्र चित्रातून रेखाटण्याचे काम दिले. साईबाबांचे वास्तव चित्र काढणे हे त्यांच्यासमोर आव्हान होते. याच दरम्यान टीव्हीवर साईबाबांवर मालिका सुरू होती. सुनील यांनी थेट त्या मालिकेचे दिग्दर्शक देबू देवधर यांची भेट घेऊन ‘स्टील’ चित्राची मदत मागितली. त्यांनी कुठलेही आढेवेढे न घेता चित्रांचा गठ्ठाच दिला. या चित्रांमधून पहिले साईबाबांचे चित्र त्यांनी साकारले. साईबाबांसमोर मद्रासी कुटुंब भजन गातांना, असे ते चित्र होते. त्यानंतर विविध प्रसंगातील १३ चित्रे काढली. परंतु अनेक असे प्रसंग होते त्यासाठी वास्तव चित्र काढणे त्यांना अडचणीचे जात होते. यावर उपाय म्हणून त्यांनी नागपूरच्या कलावंतांना सोबत घेऊन साईबाबांचे जिवंत दृश्य उभे करून स्टील फोटो घेतले. हा पहिलाच प्रयोग होता. याच प्रयोगातून साईबाबांची १२० चित्रे साकारली.