सीईटीची साईट क्रॅश, प्रचंड मनस्ताप; नागपूरचे साैम्या दीक्षित व पार्थ असाटी यांना १०० टक्के
By निशांत वानखेडे | Published: June 16, 2024 10:03 PM2024-06-16T22:03:33+5:302024-06-16T22:05:39+5:30
MHT CET exam Result Update: सना वानखेडे ९९.९७ पर्सेंटाईलसह अनुसूचित जातीतून प्रथम
नागपूर : राज्य सामाईक परीक्षा सेल (सीईटी सेल) कडून घेण्यात आलेल्या एमएचटी सीईटीत राज्यभरातून ३७ विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाईल मिळविण्याची कामगिरी केली आहे. यामध्ये नागपूरची साैम्या दीक्षित आणि पार्थ पद्मभूषण असाटी या दाेन विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. याशिवाय नागपुरातून सना उदय वानखेडे या विद्यार्थिनीने ९९.९७ टक्के पर्सेंटाईलसह अनुसूचित जाती प्रवर्गातून राज्यात दुसरी येण्याचा मान मिळविला आहे.
इंजिनिअरिंग, कृषी, फार्मसी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी सेलकडून २२ एप्रिल २०२४ ते १६ मे २०२४ या काळात दाेन गटांत परीक्षा घेण्यात आली. २२ एप्रिल ते ३० एप्रिल २०२४ पर्यंत पीसीबी ग्रुप आणि २ मे ते १६ मे २०२४ या काळात पीसीएम ग्रुपसाठी परीक्षा घेण्यात आली हाेती. दाेन्ही ग्रुपमधून राज्यभरातील ६.७५ लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. नागपूर विभागातून जवळपास एक लाख विद्यार्थी या परीक्षेला बसले हाेते.
राज्यभरातून विक्रमी ३७ विद्यार्थ्यांनी १०० टक्के पर्सेंटाईल प्राप्त केले आहेत. नागपूरची साैम्या दीक्षित या विद्यार्थिनीने पीसीबी ग्रुपमध्ये १०० टक्के पर्सेंटाईलसह सामूहिकही १०० टक्के पर्सेंटाईल घेतले आहेत.
दुसरीकडे डाॅ. आंबेडकर महाविद्यालयाचा पार्थ असाटी हा विद्यार्थी पीसीएम ग्रुपमध्ये १०० टक्के पर्सेंटाईलसह राज्यात दुसरा आणि नागपूर विभागात प्रथम आलेला आहे. ओबीसी प्रवर्गात पीसीएम ग्रुपमध्ये राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातून नागपूरची सना उदय वानखेडे ९९.९० टक्के पर्सेंटाईलसह राज्यात दुसरी आणि पीसीएम ग्रुपमध्ये प्रथम क्रमांकावर आहे.
विभागातील इतर शहरांचे गुणवंत
राज्यात १०० टक्के पर्सेंटाईल घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये वर्ध्याची अंकिता सागर या विद्यार्थिनीचाही समावेश आहे. तिने पीसीएम ग्रुपमध्येही १०० टक्के पर्सेंटाईल घेतले आहेत. अकाेला येथील सृजन आत्राम हा पीसीबी ग्रुपमध्ये ९९.९७ टक्के पर्सेंटाईलसह एसटी प्रवर्गातून राज्यात प्रथम आला आहे. एनटी-२ प्रवर्गातून वर्धा येथील प्रणव तानाजी गावंड पीसीएममध्ये १०० टक्के पर्सेंटाईल आणि एनटी-३ वर्ध्याचीच आराध्या महादेव सानप हिनेही पीसीएम ग्रुपमध्ये १०० टक्के पर्सेंटाईल घेतले आहेत.
पार्थचे लक्ष्य आयआयटीच हाेते
नागपूरचा पार्थ असाटी हा पीसीएम ग्रुपमध्ये १०० टक्के पर्सेंटाईलसह राज्यात दुसरा तर ओबीसी प्रवर्गात पहिला आला आहे. डाॅ. आंबेडकर महाविद्यालयाच्या पार्थला बारावीमध्ये ९३.५ टक्के गुण हाेते. याशिवाय जेईई मेन्समध्ये ९९.९० टक्के गुण मिळाले, तर जेईई अॅडव्हान्समध्ये देशात २२२१ वी रँक आणि ओबीसी प्रवर्गात २७२ वी रँक प्राप्त केली आहे. पार्थचे वडील डाॅ. पद्मभूषण असाटी हे कामठी राेडवरील आशा रुग्णालयात डाॅक्टर आहेत, तर आई गृहिणी. मात्र पार्थला सुरुवातीपासून गणित विषयात रूची हाेती व आयआयटी हेच त्याचे लक्ष्य हाेते. जेईई अॅडव्हान्समध्ये चांगले गुण मिळाले असतानाही दुसरा पर्याय असावा म्हणून त्याने एमएचटी-सीईटीची परीक्षा दिली हाेती.