संतांनी भक्तिमार्गातून सुसंस्कृत मनाचा मळा फुलविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 12:48 AM2018-07-06T00:48:08+5:302018-07-06T00:50:17+5:30

कुणाच्या आयुष्याला दिशा दिली तर कुणाच्या जीवनात परिवर्तन घडविले. देव कुणी पाहिला नाही तरी लोक भांडतात. संतांनी मात्र समतेची, सर्वधर्मसमभावाची शिकवण दिली. परमार्थिक कल्याण व ऐहिक कल्याण साधून आध्यात्मिक लोकशाही रुजविण्याचे काम संतांनी केले. अज्ञान, अंधकारात गुरफटलेल्या समाजाला विवेकनिष्ठ दृष्टीने प्रकाशमान करण्याचे काम केले. संतांनी खऱ्या अर्थाने भक्तिमार्गातून सुसंस्कृत मनाचा मळा फुलविला, असे मनोगत ‘संत साहित्याने मला काय दिले?’ विषयावर बोलताना वक्त्यांनी व्यक्त केले.

The saints developed a cultured mind from the devotional path | संतांनी भक्तिमार्गातून सुसंस्कृत मनाचा मळा फुलविला

संतांनी भक्तिमार्गातून सुसंस्कृत मनाचा मळा फुलविला

googlenewsNext
ठळक मुद्देपरिसंवादात वक्त्यांचे मनोगत : यशवंत महोत्सवात संत साहित्याचे विवेचन


लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कुणाच्या आयुष्याला दिशा दिली तर कुणाच्या जीवनात परिवर्तन घडविले. देव कुणी पाहिला नाही तरी लोक भांडतात. संतांनी मात्र समतेची, सर्वधर्मसमभावाची शिकवण दिली. परमार्थिक कल्याण व ऐहिक कल्याण साधून आध्यात्मिक लोकशाही रुजविण्याचे काम संतांनी केले. अज्ञान, अंधकारात गुरफटलेल्या समाजाला विवेकनिष्ठ दृष्टीने प्रकाशमान करण्याचे काम केले. संतांनी खऱ्या अर्थाने भक्तिमार्गातून सुसंस्कृत मनाचा मळा फुलविला, असे मनोगत ‘संत साहित्याने मला काय दिले?’ विषयावर बोलताना वक्त्यांनी व्यक्त केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र नागपूरच्यावतीने सुरू असलेल्या यशवंत महोत्सवात दुसऱ्या दिवशी संत साहित्याचे विवेचन करणारे पुष्प गुंफण्यात आले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या परिसंवादात राज्याचे माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके, डॉ. मोहम्मद असदुल्लाह, प्रा. नारायण निकम व ज्ञानेश्वर रक्षक वक्ता म्हणून उपस्थित होते. यावेळी प्रतिष्ठानच्या विभागीय केंद्राचे गिरीश गांधी, समीर सराफ प्रामुख्याने उपस्थित होते.
वसंत पुरके यांनी, संत साहित्यामुळे माझ्यासारखा सामान्य माणूस मंत्री पदापर्यंत पोहचू शकल्याची भावना व्यक्त केली. ‘आम्हा घरी धन, शब्दांचीच रत्ने...’ या तुकोबाच्या अभंगाने परिवर्तन घडल्याचे सांगत सत्य, निष्ठा, स्वातंत्र्य, समता, मानवता, प्रेम, कणव संतांच्या विचारांमध्ये असल्याचे सांगितले. जे अगम्य, अनाकलनीय आहे, ते लोकांना सांगण्याची ताकद संतांच्या विचारात आहे. ‘मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण...’ म्हणत मरणाऱ्यालाही वाचविण्याची ताकद संतांच्या विचारात आहे. आध्यात्मिक लोकशाहीची प्राणप्रतिष्ठा संत साहित्यात आहे. विवेक आणि विज्ञाननिष्ठ समाज निर्माण व्हावा, ही संतांची दृष्टी अंगिकारणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
ज्ञानेश्वर रक्षक बोलताना म्हणाले, घरी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचे वातावरण असल्याने लहानपणापासून त्यांच्याबद्दल आदर आणि श्रद्धेचे वातावरण होते. मात्र युवावस्थेत राष्ट्रसंतांच्या विचाराचा प्रभाव निर्माण झाला. तुकडोजी महाराजांचे विचार लोकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करतोय. त्यांच्या साहित्याने ग्रंथ नाही तर समाज वाचायला शिकलो. राष्ट्रसंतांच्या प्रार्थनेने जीवन जगण्याची दिशा दिली. संतांचे विचार वाचायचे नाही तर जगायचे असतात, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. डॉ. असदुल्लाह मनोगत व्यक्त करताना म्हणाले,महाराष्ट्रात जी शिकवण संतांनी दिली तीच शिकवण इस्लाम शिकविणाऱ्या वली, सुफीया व औलियांनी दिली. विदर्भात ताजुद्दीन बाबा, मो. चिश्ती रहमतुल्लाह यांची परंपरा आहे. हिंदू मुस्लीम ऐक्याचा संदेश देताना जीवन जगण्याची शैली या औलियांनी सांगितली. आजच्या अराजकाच्या वातावरणात या संतांच्या विचारांची गरज असल्याचे ते म्हणाले. प्रा. नारायण निकम म्हणाले, आज कथा, प्रवचन करणाऱ्या संत म्हणवणाऱ्यांचे पेव फुटले आहे. मात्र संत होणे एवढे सोपे नाही. स्वत:च्या ज्ञानाने स्वत:ला व इतरांना तारण्याची शक्ती असलेले चालतेबोलते ब्रह्म म्हणजे संत. आत्मोद्धार व लोकोद्धाराचा संगम त्यांच्यात असतो. संतांनी अभंगातून जीवनाच्या चैतन्याचे मळे फुलविले आहेत. जगात चार पुरुषार्थ मानले जातात, पण संतांनी भक्तीचा पाचवा पुरुषार्थ दिला. संतांनी भक्तीचा मार्ग दाखवून महाराष्ट्राच्या भूमीला सार्थ केल्याचे मत प्रा. निकम यांनी मांडले. 
अध्यक्षीय भाषण करताना डॉ. सिद्धार्थ विनायक काणे म्हणाले, संतांनी सर्व समाजाला, देशाला खूप काही दिले, मात्र त्यांच्या विचारातून आपण काय घेतले हे महत्त्वाचे आहे. देशात दुष्प्रवृत्ती फोफावत असल्याने संतांची आवश्यकता पडली आहे. समाजात सत्प्रवृत्ती व दुष्प्रवृत्ती अनादीकाळ सुरू राहील. मात्र आपल्या व समाजाच्या भल्यासाठी संत प्रवृत्तीच्या माणसांशी संगत करणे महत्त्वाचे आहे, ही गोष्ट संत साहित्याच्या प्रभावातून शिकल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. परिसंवादाचे प्रास्ताविक गिरीश गांधी यांनी केले. संचालन डॉ. प्रदीप विटाळकर यांनी केले. बाळ कुळकर्णी यांनी आभार मानले. 

यशवंत महोत्सवात आज
यशवंत महोत्सवांतर्गत ६ जुलै रोजी सायंकाळी ५.३० वाजता बाबुराव धनवटे सभागृहात ‘अभिव्यक्ती : जी.ए. कुळकर्णींची कथा’ या विषयावर सादरीकरण होईल.  अजित दिवाडकर व दिनकर बेडेकर हे सादरीकरण करतील. 

Web Title: The saints developed a cultured mind from the devotional path

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.