समाजमन रोगमुक्त करण्यासाठी संतांची ‘थेरपी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 01:24 AM2017-09-27T01:24:59+5:302017-09-27T01:25:17+5:30

समाजात भेदभाव वाढीस लागला असताना संतांनी शब्दांचा उपयोग करून समाजमन रोगमुक्त करण्यासाठी ‘थेरपी’च वापरली. ओवी, कीर्तन इत्यादी माध्यमांतून तत्कालीन संतांनी केलेली ही बंडखोरी समाजमन दुरुस्त करणारी उपचार पद्धत ठरली.

Saints' therapy for freeing society | समाजमन रोगमुक्त करण्यासाठी संतांची ‘थेरपी’

समाजमन रोगमुक्त करण्यासाठी संतांची ‘थेरपी’

Next
ठळक मुद्देराजन गवस : ‘संत साहित्यातील सामाजिक बंडखोरी’वर राज्यस्तरीय चर्चासत्र

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : समाजात भेदभाव वाढीस लागला असताना संतांनी शब्दांचा उपयोग करून समाजमन रोगमुक्त करण्यासाठी ‘थेरपी’च वापरली. ओवी, कीर्तन इत्यादी माध्यमांतून तत्कालीन संतांनी केलेली ही बंडखोरी समाजमन दुरुस्त करणारी उपचार पद्धत ठरली. समाजाचे रोगनिदान करणाºया या संत पद्धतीचा सखोल अभ्यास करण्याची आवश्यकता आहे, असे मत प्रसिद्ध साहित्यिक राजन गवस यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन आणि वाडी येथील जवाहरलाल नेहरू महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी ‘संत साहित्यातील सामाजिक बंडखोरी’ या विषयावर राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
विद्यापीठाच्या ‘कॅम्पस’मधील ग्रामगीता भवनात झालेल्या या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी नागपूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले होते तर स्वागताध्यक्ष माजी मंत्री रणजित देशमुख होते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे तसेच माजी अध्यक्ष प्रा. वसंत आबाजी डहाके, राष्ट्रसंत तुकडोजी अध्यासनचे प्रमुख डॉ. प्रमोद मुनघाटे, जवाहरलाल नेहरू महाविद्यालयाचे प्राचार्य जीवन दोंतुलवार, मराठी विभागप्रमुख डॉ. कल्पना बोरकर हे देखील प्रामुख्याने उपस्थित होते. स्वत:च्या जगण्यातील नैतिकता शब्दांत उतरवत संत नामदेव, संत तुकाराम इत्यादी संतांनी साहित्याची वेगवेगळी उपचार पद्धत वापरली. या माध्यमातून त्यांनी लोकमानस बदलण्याचा प्रयत्न केला, असे प्रतिपादन गवस यांनी केले. धार्मिक, सांस्कृतिक संघर्ष होत असताना संतांनी भक्तिचळवळ उभारली होती. ती तेव्हाच्या काळाची गरज होती.
व्यवस्थेचा विरोध करून समाजाला जोडण्याचा प्रयत्न करणाºया संतांची ही बंडखोरीच होती. संत साहित्य हे केवळ अध्यात्म व धर्मापुरते मर्यादित नाही तर ते संतांच्या चळवळीचे प्रभावी साहित्य होते. संतांनादेखील समाजाने नाकारले नाही तर सर्वांनी त्यांना समान वागणूक दिली, अशी भूमिका बीजभाषणादरम्यान प्रा. वसंत आबाजी डहाके यांनी मांडली.
या चर्चासत्राच्या पहिल्या सत्राचे अध्यक्ष प्रसिद्ध संशोधक डॉ. अशोक राणा होते तर डॉ. अलका गायकवाड, डॉ. अनिल नितनवरे, डॉ. पद्मरेखा धनकर, डॉ. राजेंद्र नाईकवाडे यांनी शोधनिबंध सादर केला. सूत्रसंचालन डॉ. कोमल ठाकरे यांनी केले तर प्रास्ताविक जीवन दोंतुलवार यांनी केले. डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी आभार मानले.

...तर संस्कृत का लादायचे ?
नागपूर विद्यापीठासोबतच संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा प्रभार सांभाळणाºया डॉ.प्रमोद येवले यांनी यावेळी संस्कृत भाषेसंदर्भात मतप्रदर्शन केले. रामटेक येथे कुलगुरुपदाची सूत्रे स्वीकारत असताना संस्कृत मंत्रोच्चार करण्यात आले. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे मला यातील एकाचाही अर्थ समजला नाही. अशीच अवस्था इतरांचीदेखील होती. जर समजतच नसेल तर संस्कृत लादणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
धर्माला ग्लानी येते तेव्हाच बंड होते
यावेळी डॉ.अक्षयकुमार काळे यांनी आपली भूमिका मांडली. धर्मव्यवस्था ही समाजाच्या हितासाठीच होती. मात्र त्याचा दुरुपयोग व्हायला लागला. धर्माला ग्लानी येते तेव्हाच बंडदेखील होते. त्याकाळी पुरोहितशाही बळावली होती. संस्कृत भाषेतील ज्ञान पुरोहितांपुरतेच मर्यादित राहिले. ही मक्तेदारी संपवण्यासाठी तत्कालीन समाजव्यवस्थेनुसार खालच्या मानल्या जाणाºया वर्गातील संतांनी बंड पुकारले. महाराष्ट्रीयन संत परंपरा म्हणजे स्त्री आणि क्षुद्रांचे संमेलनच होते. संतांमध्ये बहुजनांविषयी कळवळा व जिव्हाळा होता, असे डॉ. काळे म्हणाले.

Web Title: Saints' therapy for freeing society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.