सैराटच्या 'आर्ची'ने साधला रुग्णाशी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 12:56 AM2020-01-25T00:56:49+5:302020-01-25T00:58:27+5:30
सैराट चित्रपटात ‘आर्ची’ची भूमिका साकारणारी रिंकू राजगुरू हिने शुक्रवारी अर्धांगवायुच्या रुग्णांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सैराट चित्रपटात ‘आर्ची’ची भूमिका साकारणारी रिंकू राजगुरू हिने शुक्रवारी अर्धांगवायुच्या रुग्णांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी न्यूरॉन हॉस्पिटलचे संचालक, प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. प्रमोद गिरी व डॉ. चंद्रशेखर पाखमोडे यांनी या आजाराची लक्षणे, उपचार व घ्यावयाची काळजी याविषयीची माहिती दिली.
एका चित्रपटाच्या निमित्ताने रिंकू नागपूरला आली होती. तिच्या चित्रपटात ‘न्यूरो सर्जरी’च्या एका प्रसंगामुळे तिने न्यूरॉन हॉस्पिटल, धंतोलीला भेट दिली. या प्रसंगी तिच्यासोबत सहकलाकार चिन्मय उद्गीरकर, दिग्दर्शक गणेश पाटील उपस्थित होते. यावेळी डॉ. मंजुषा गिरी, डॉ. मनिषा पाखमोडे, डॉ. वर्तिका पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.
रिंकूने अतिदक्षता विभागात रुग्णांची विचारपूस केली. डॉ. गिरी म्हणाले की, न्यूरो सर्जरीमध्ये वेदना आणि दु:ख जास्त आहेत. त्यांच्या वेदना कशा कमी होतील आणि त्यांना सर्वोत्कृष्ट उपचार कसा मिळू शकेल यासाठी आम्ही तत्पर असतो. यावेळी त्यांनी रोबोटिक न्यूरो रिहॅबिलिटेशनद्वारे अर्धांगवायू आणि अन्य मेंदूंच्या आजारातील रुग्णांवरील उपचाराचीही माहिती दिली. मेंदूची शस्त्रक्रिया गुंतागुंतीची असल्याचे सांगत डॉ. पाखमोडे म्हणाले, शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना प्रेमळ वातावरण उपलब्ध करून दिल्यास रुग्ण उपचाराला चांगला प्रतिसाद देतो.