सकल जिवांच्या ठायी राम...चराचरातील जागर राम : ५३ वर्षांची नेत्रदीपक परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 11:32 PM2019-04-13T23:32:20+5:302019-04-13T23:41:11+5:30

चैत्र शुद्ध नवमी म्हणजे चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस. असत्यावर सत्याचा विजय मिळवणाऱ्या प्रभू श्रीरामाचा जन्म याच पावन दिवशी झाला. रामजन्माचा हा आनंद साजरा करताना अवघी नागपूरनगरी शनिवारी श्रद्धेच्या अपूर्व सत्संगात न्हाऊन निघाली. श्रद्धेच्या या सत्संगाचे प्रमुख केंद्र होते श्री पोद्दारेश्वर राम मंदिर. देखण्या स्वागत कमानी...फुलांचा स्वर्गीय दरवळ...प्रसादाचा घमघमाट...भगवे फेटे घातलेल्या तरुणांचे शिस्तबद्ध संचलन...मुखी प्रभू श्रीरामाचा अखंड जयघोष...नभात तळपणाऱ्या सूर्यनारायणाची बाह्य ऊर्जा अन् भक्तांच्या अंतरातील चैतन्य जागविणारी आंतरऊर्जा यांचा दैवी संगम... अशा श्रद्धेच्या अपूर्व सत्संगात श्रीराम नवमी शोभायात्रेत रविवारी हजारो भाविकांनी रामनामाचा गजर केला. श्रीराम जय राम जय जय राम, प्रभू श्री रामचंद्र की जय, राम जन्मला गं सखे राम जन्मला अशा रामनामाच्या जयघोषाने पश्चिम नागपूरही दुमदुमले.

Sakal Jiwanchya Thai Ram: Jagar Ram in the agrarian: 53 years of spectacular tradition | सकल जिवांच्या ठायी राम...चराचरातील जागर राम : ५३ वर्षांची नेत्रदीपक परंपरा

श्रीरामनवमीनिमित्त अवघी नागपूरनगरी श्रद्धेच्या अपूर्व सत्संगात न्हाऊन निघाली. श्रद्धेच्या या सत्संगाचे प्रमुख केंद्र होते श्री पोद्दारेश्वर राम मंदिर. या मंदिरातून निघणाºया शोभायात्रेचे यंदाचे ५३ वे वर्ष होते. सजलेल्या श्रीरामाच्या रथाची आरती झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, रस्ते बांधणी व जलसंसाधन मंत्री नितीन गडकरी, राज्याचे ऊर्जा तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. सुधाकर देशमुख व मान्यवरांनी सजवलेल्या शक्तिरथाचे पूजन करून रथ ओढला. नेत्रदीपक चित्ररथ शोभायात्रेचे प्रमुख आकर्षण होते. हजारो रामभक्तांचा यात सहभाग होता. ठिकठिकाणी मुस्लीम बांधवांनी पुष्पवृष्टी करून शोभायात्रेचे स्वागत केले. -राजेश टिकले

Next
ठळक मुद्देश्री पोद्दारेश्वर मंदिरातून भव्यदिव्य शोभायात्रा, मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री गडकरी, तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चैत्र शुद्ध नवमी म्हणजे चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस. असत्यावर सत्याचा विजय मिळवणाऱ्या प्रभू श्रीरामाचा जन्म याच पावन दिवशी झाला. रामजन्माचा हा आनंद साजरा करताना अवघी नागपूरनगरी शनिवारी श्रद्धेच्या अपूर्व सत्संगात न्हाऊन निघाली. श्रद्धेच्या या सत्संगाचे प्रमुख केंद्र होते श्री पोद्दारेश्वर राम मंदिर. देखण्या स्वागत कमानी...फुलांचा स्वर्गीय दरवळ...प्रसादाचा घमघमाट...भगवे फेटे घातलेल्या तरुणांचे शिस्तबद्ध संचलन...मुखी प्रभू श्रीरामाचा अखंड जयघोष...नभात तळपणाऱ्या सूर्यनारायणाची बाह्य ऊर्जा अन् भक्तांच्या अंतरातील चैतन्य जागविणारी आंतरऊर्जा यांचा दैवी संगम... अशा श्रद्धेच्या अपूर्व सत्संगात श्रीराम नवमी शोभायात्रेत रविवारी हजारो भाविकांनी रामनामाचा गजर केला. श्रीराम जय राम जय जय राम, प्रभू श्री रामचंद्र की जय, राम जन्मला गं सखे राम जन्मला अशा रामनामाच्या जयघोषाने पश्चिम नागपूरही दुमदुमले. 


पोद्दारेश्वर राममंदिरातून निघालेल्या शोभायात्रेसाठी खास रथ तयार करण्यात आला होता. या रथावर प्रभू श्रीराम, सीता आणि लक्ष्मणाची प्रतिमा विराजमान करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते प्रभू श्रीरामाचे पुजन करण्यात आले. यावेळी तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ऊर्जामंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, आमदार कृष्णा खोपडे, सुधाकर देशमुख, डॉ. मिलिंद माने, विकास कुंभारे, गिरीश व्यास, उपमहापौर दीपराज पार्डीकर, माजी महापौर प्रवीण दटके, पोलीस आयुक्त डॉ. भूषण कुमार उपाध्याय, माजी मंत्री रमेश बंग, जयप्रकाश गुप्ता, नगरसेवक दयाशंकर तिवारी, विक्की कुकरेजा, अ‍ॅड. संजय बालपांडे, सरला नायक, विद्या कन्हेरे, प्रदीप पोहाणे, अजय तारवानी, बोधाराम तारवानी, अशोक गोयल, हर्ष अग्रवाल, सुरेश जैस्वाल, पुष्करलाल अग्रवाल, विजय अग्रवाल, राजेश रोकडे, नवल अग्रवाल, अनिल कुमार व सुनील कुमार गुप्ता, ताराचंद अग्रवाल यांनी श्रीरामाला पुष्पमाला अर्पण केली. रथाचे पुजन करून मुख्यमंत्री, राज्यपाल, केंद्रीय मंत्री, पालकमंत्री, महापौर यांनी रथाचा दोरखंड ओढून शोभायात्रेला प्रारंभ केला.
५०१ स्वयंसेवकांनी केला शंखनाद
श्री पांचजन्य श्रीराम सेवक दलातर्फे ३५१ स्वयंसेवकांनी शोभायात्रेत शंखनाद करून अख्खा परिसर दुमदुमुन सोडला होता. पांढरे शुभ्र वस्त्र, डोक्यावर भगव्या टोप्या, हातात शंख घेतलेले हे युवक मुख्य रथाच्या पुढे होते. नगाऱ्याचा दणदणाट, घंटाचा आवाज आणि शंखनादामुळे वातावरण भक्तिमय झाले होते. त्याचबरोबर पिवळे वस्त्र परिधान करून डोक्यावर मंगल कलश घेऊन १०८ महिला शोभायात्रेत पायी चालत होत्या. रामधून पठण, हनुमान चालिसा पठण, उद्घोषणा करणारे पथक, स्केटिंगद्वारे नृत्याचे पथक, सिंधी छेज नृत्य, शिव गर्जना ध्वज पथक, लेझिम पथक, भांगडा नृत्य, श्रीराम वचनामृताचे फलक घेऊन चालणारे युवक असे एक भारावलेले वातावरण शोभायात्रेदरम्यान बघायला मिळाले.
देशात सक्षम सरकार यावे - मुख्यमंत्री
या देशात सक्षम सरकार स्थापन व्हावे, असा आशीर्वाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीरामाचे दर्शन घेऊन मागितला. ते म्हणाले की, देशाचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम आहे. आपण त्यांना मर्यादा पुरुषोत्तम असे म्हणतो. श्रीरामाने खºया अर्थाने सामान्य माणसाला जगण्याचा मार्ग दाखविला आहे. नागपूरची शोभायात्रा देशभरातील एक सांस्कृ तिक महोत्सव असून, सर्व धर्माचे लोक शोभायात्रेत सहभागी होऊन रामनामाचा जप करतात.
देशात रामराज्य स्थापन व्हावे - गडकरी
प्रभू श्रीरामाने दाखविलेल्या मार्गावर चालण्याचा संकल्प प्रत्येकाने करावा. या देशातून उपासमारी, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या संपावी, देशात रामराज्याची स्थापना व्हावी, अशी भावना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.
अमन शांती समितीने दिला राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश
मोमीनपुऱ्यात अमन शांती समितीतर्फे प्रभू श्रीरामाच्या जन्मोत्सवानिमित्त निघणाऱ्या शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. श्रीराम विराजमान असलेल्या रथावर पुष्पवर्षाव करण्यात आला. देशात प्रसिद्ध असलेल्या नागपुरातील प्रभू श्रीरामाच्या शोभायात्रेतून सामाजिक ऐक्याचा संदेश देशभर पोहचावा, अशी अपेक्षा समितीचे अध्यक्ष बाबा खान, उपाध्यक्ष आसिफ कर्नल व महासचिव शेख आमिर यांनी व्यक्त केली.

Web Title: Sakal Jiwanchya Thai Ram: Jagar Ram in the agrarian: 53 years of spectacular tradition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.