सकल मराठा समाजाचा ठोक मोर्चा शांततेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 01:23 AM2018-08-08T01:23:35+5:302018-08-08T01:24:31+5:30
आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाचा ९ आॅगस्टचा ठोक मोर्चा शांततेत निघणार आहे. मोर्चाच्या यशस्वीतेसाठी आणि कुठलीही अनुचित घटना घडू नये, याकरिता व्यापारी संघटना आणि लोकांनी मोर्चाला सहकार्य करावे तसेच व्यापाऱ्यांनी दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवावीत, असे आवाहन राजे मुधोजी भोसले यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाचा ९ आॅगस्टचा ठोक मोर्चा शांततेत निघणार आहे. मोर्चाच्या यशस्वीतेसाठी आणि कुठलीही अनुचित घटना घडू नये, याकरिता व्यापारी संघटना आणि लोकांनी मोर्चाला सहकार्य करावे तसेच व्यापाऱ्यांनी दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवावीत, असे आवाहन राजे मुधोजी भोसले यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत केले.
९ आॅगस्टला सकाळी ९ वाजता समाजबांधव व महिला महाल, गांधीगेट येथील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ गोळा होणार आहे. १० वाजता महाआरती आणि त्यानंतर आंदोलनाला सुरुवात होईल. मोर्चाला गालबोट लागू नये म्हणून समाजाने जिल्हाधिकारी, पोलीस विभाग, शिक्षण विभाग, एसटी महामंडळ, व्यापारी संघटनांना निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा केली आहे. समाजबांधव प्रशासन आणि पोलिसांना सहकार्य करणार आहे. यादिवशी जवळपास २५ हजार समाजबांधव आणि महिला रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे. चौकाचौकात जाऊन युवक शासनाविरोधात निदर्शने करतील. बसेस आमची संपत्ती असून कुठलीही अनुचित घटना होणार नाही तसेच आरक्षणाच्या मागणीसाठी दुसºयाला त्रास होणार नाही, याची काळजी घेण्यात येणार आहे. व्यापाºयांनी दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवावीत, असे आवाहन त्यांना करण्यात आले आहे. ९ आॅगस्टनंतर शासनाची भूमिका सकारात्मक न राहिल्यास आंदोलन उग्र होईल, असे भोसले यांनी सांगितले.
आंदोलनात सकल मराठा समाज कुटुंबीयांसह उतरणार आहे. नागपुरात समाजाची जवळपास ५० हजार घरे आहेत. मराठा समाज नेहमीच लोकांसाठी लढला आहे. आता तो पैसा आणि शिक्षणापासून वंचित आहे. आर्थिक निकषावर आरक्षण मिळून मुलांनी उच्चशिक्षण घेऊन देशसेवा करावी, अशी इच्छा आहे. कुणाचेही आरक्षण हिरावून आम्हाला आरक्षण नको आहे. १६ टक्के आरक्षणाची मागणी आहे. आंदोलनाला भावसार, हलबा युवा समाज, मुस्लीम परिषदेसह अनेक समाजाचा पाठिंबा मिळाला आहे. या दिवशी शहरात तीन मोठे कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमाला समाजाने पाठिंबा दिल्याचे भोसले यांनी सांगितले.
पत्रपरिषदेत प्रशांत मोहिते, शिरीष राजे शिर्के, देविदास किरपाने, नरेंद्र मोहिते, प्रशांत भोसले, राजे जयसिंग भोसले, विनय बाबर, शीतल सुरसे, हेमंत भोसले, छोटू पवार, लक्ष्मीकांत किरपाने, छोटू शिंदे, रोहिणी भोसले, पल्लवी जाधव, मेघा शिंदे, सोनिया साबळे, स्वाती चव्हाण, दत्तूजी जगताप, विजय भोसले, बाळासाहेब गायकवाड उपस्थित होते.
पोलिसांची मॉक ड्रील
९ आॅगस्टला महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर उपराजधानीतील कायदा आणि सुव्यवस्थेची चाचपणी करण्यासाठी शहर पोलिसांनी मंगळवारी विविध भागात मॉक ड्रील(रिहर्सल)केली.
मराठा आरक्षणाच्या संबंधाने मराठा समाजाने ९ आॅगस्टला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्यामुळे राज्य पोलीस दलाने आवश्यक त्या उपाययोजना सुरू केल्या असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी खबरदारी घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर, शहर पोलिसांनी आज शहरात विविध भागात सुरक्षेची चाचपणी केली. पुढच्या आठवड्यात स्वातंत्र्यदिन आहे. त्यामुळे देशभर अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.