पिपळा डाक बंगला येथे साकारले शिवधाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:07 AM2021-06-04T04:07:56+5:302021-06-04T04:07:56+5:30
संदीप तलमले पिपळा (डाक बंगला) : मृत्यू अंतिम सत्य आहे. कोरोनाच्या महामारीमुळे गतवर्षीपासून लॉकडाऊन सुरू आहे. यामुळे सामान्य नागरिक ...
संदीप तलमले
पिपळा (डाक बंगला) : मृत्यू अंतिम सत्य आहे. कोरोनाच्या महामारीमुळे गतवर्षीपासून लॉकडाऊन सुरू आहे. यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पिपळा येथील ग्रा.पं. सदस्य अरविंद सातपुते व ग्रा.पं. कर्मचारी अरुण पातूरकर यांच्यासह ३८ नागरिकांचा मृत्यू झाला.
गावातील स्मशानभूमीत एकही मूलभूत सुविधा नसल्याने अंत्यविधीसाठी मृतांच्या नातेवाईकांना वणवण भटकावे लागले. गावात सुसज्ज स्मशानभूमीची मागणी गत ५० वर्षांपासून आहे. मात्र कुणीही याकडे लक्ष दिले नाही. येथे मृतदेह जाळण्यासाठी शेडही नव्हते. त्यामुळे गावातील ज्येष्ठ, तरुण व महिलांनी एकत्र येत स्मशानभूमी व शिवधाम साकारण्याचा संकल्प केला. यात कुठलीही राजकीय मदत मिळाली नाही. शेवटी लोकसहभागातून स्मशानभूमीत सौंदर्यीकरण व सुविधा निर्माण करण्याचे ठरले. गत पाच महिन्यापासून सुरू असलेले कार्य या महिन्यात शेवटच्या टप्प्यात आले. ग्रामस्थांच्या परिश्रमानंतर गावात शिवधाम निर्माण झाले. या कार्यात ग्रामपंचायतकडून पाण्याचे पाईप देण्यात आले. गावातील टाकीवरून स्मशानभूमी येथे पाणी आणण्यात आले. येथे पाळीव प्राणी व पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. परिसरात वृक्षारोपण करून मोठ्या झाडाखाली नागरिकांना बसण्यासाठी आसनव्यवस्था करण्यात आली. आकर्षक रंगरंगोटी, स्ट्रीट लाईट, वाॅटरफॉल, फ्लेक्स बोर्ड, रेडियम, फोमबोर्ड, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची येथे व्यवस्था करण्यात आली. या परिसरात सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. नागरिकांना व महिलांना स्मशानभूमीत भीती वाटू नये करिता सोलर पॅनलच्या आधारावर २४ तास ‘ओम नम: शिवाय’ची धून लावण्यात आली आहे. तसेच इतर परिसरात शंख, कलश, नारळ, डमरू, रुद्राक्ष, शिवमूर्ती व शिवलिंगाची स्थापना करण्यात आली. येथील सुविधा बघता नागपूर व परिसरातील इतर गावातून नागरिक शिवधाम येथे भेट देण्याकरिता येत आहेत. या कार्यात हरिनारायण समर्थ, सुरेश भगत, शेखर पाटील, नितीन नरड, आशिष सावरकर, सुनील सावरकर, गोलू सावरकर, अतुल पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी महत्त्वाचे योगदान दिले.