सख्या रे घायाळ मी हरिणी : लागू-फुले 'अॅक्टिंग स्कूल'ने भारावले रसिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 11:40 PM2020-02-07T23:40:06+5:302020-02-07T23:41:50+5:30
‘सख्या रे घायाळ मी हरिणी’ हे मोहन आगाशे व निळू फुले आणि बॅकड्रापला डॉ. लागू यांची पार्श्वभूमी असलेले गाणे वाजते, तेव्हा रसिकांच्या तोंडून ‘व्वा क्या बात है’ असे शब्द ऐकू येतात, तेव्हा अभिनय हृदयाचा ठोका कसा चुकवतो, याची जाणीव झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : निळू फुले, डॉ. श्रीराम लागू, मोहन आगाशे या रंगमंचावर वावरणाऱ्या मातब्बर नटांनी स्वत:चे वेगळे असे ‘अॅक्टिंग स्कूल’ निर्माण केले आहे. फुले, लागू आता हयात नाहीत. मात्र, त्यांच्या अभिनयाची जुगलबंदी मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी आजही रसिक उत्सुक आहेत, याची अनुभूती चौथ्या ऑरेंज सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दिसून आली. १०० व्या नाट्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांचा गाजलेला ‘सामना’ हा चित्रपट बघण्यासाठी रसिक सज्ज होते आणि चित्रपटातील एका रंजक घटनेवर जेव्हा अतिशय प्रासंगिक असे ‘सख्या रे घायाळ मी हरिणी’ हे मोहन आगाशे व निळू फुले आणि बॅकड्रापला डॉ. लागू यांची पार्श्वभूमी असलेले गाणे वाजते, तेव्हा रसिकांच्या तोंडून ‘व्वा क्या बात है’ असे शब्द ऐकू येतात, तेव्हा अभिनय हृदयाचा ठोका कसा चुकवतो, याची जाणीव झाली.
आयनॉक्स तुली मॉल येथे सुरू असलेल्या या चित्रपट महोत्सवात शुक्रवारी विविध भाषांतील देश-परदेशातील चित्रपटांचे सादरीकरण झाले. मात्र, उत्सुकता होती ती ‘सामना’चीच. रसिकांच्या संगतीला खुद्द डॉ. जब्बार पटेलही होते. त्यामुळे, अशा आशघन चित्रपटाचा रसास्वाद घेण्याची बातच निराळी होती. ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’ हे संपूर्ण चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर असलेले गाणे, जणू डोळ्यातून चटक अश्रूची धार मोकळी करणारे होते.
कथानक तेच, बोलीभाषा वेगळेपण देते - जब्बार पटेल
हॉलिवूड आणि मराठी चित्रपटांतील फरक हाच आहे की हॉलिवूडपटात प्रत्येक पात्राची स्वतंत्र बोलीभाषा असते. मराठीमध्ये मात्र प्रमाण भाषेचाच आग्रह दिसून येतो. कथानकांमध्ये आता वेगळेपणा कुठून आणणार. बोलीभाषा आणि त्या भागातील संवेदनेमुळे चित्रपटांच्या कथेला वेगळा आयाम मिळतो ही बाब आता मराठी दिग्दर्शकांनी हेरायला हवी. विदर्भात वेगवेगळ्या बोली आहेत. त्या बोली सहज उतरतील तर मजा येईल, अशी भावना डॉ. जब्बार पटेल यांनी बोलून दाखवली.
ऑक्टोबरमध्ये घेऊ चित्रपट समीक्षा कार्यशाळा
हल्ली चित्रपटांचे रिव्ह्यूच येतात. त्यालाच समीक्षण म्हणण्याचा चुकीचा पायंडा पडला आहे. समीक्षणाची समज निर्माण होण्यासाठी ऑक्टोबरमध्ये चित्रपट समीक्षा कार्यशाळा घेण्याचा विचार सुरू असल्याचे जब्बार पटेल म्हणाले.