भोसलेकालीन सक्करदरा तलाव बनला धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:06 AM2021-07-02T04:06:55+5:302021-07-02T04:06:55+5:30
संरक्षण व सौंदर्यीकरण ठप्प : पायऱ्या खचल्या; तलावालगतचा रस्ता खचण्याचा धोका लोकमत जागर- लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : उपराजधानीचे ...
संरक्षण व सौंदर्यीकरण ठप्प : पायऱ्या खचल्या; तलावालगतचा रस्ता खचण्याचा धोका
लोकमत जागर-
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीचे वैभव असलेल्या भोसलेकालीन सक्करदरा तलावाचे संरक्षण व सौंदर्यीकरणाच्या कामाला दोन वर्षांपूर्वी सुरुवात करण्यात आली होती. मात्र मागील दीड वर्षापासून काम ठप्प आहे. उद्यानाच्या बाजूच्या तलावाच्या पायऱ्या खचायला लागल्या आहेत. पावसाळ्यात तलावात पाणी साचल्यानंतर छोटा ताजबाग बाजूचा रस्ता खचण्याचा धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने याची वेळीच दखल न घेतल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे.
मूलभूत सोयीसुविधा विकास योजनेंतर्गत तलावाचे संरक्षण व सौंदर्यीकरणासाठी २९ जुलै २०१९ रोजी १० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. शासनाकडून निधी प्राप्त झालेला नसला तरी तलावाच्या पूर्वेकडील संरक्षण भिंत कोसळल्याने निर्माण झालेला धोका विचारात घेता स्थायी समितीच्या ठरावानुसार मनपा प्रशासनाने कार्यादेश दिले होते. ९ सप्टेंबर २०१९ रोजी कार्यादेश मिळताच मे. जखापूर जगदंबा कंन्स्ट्रक्शन प्रा. लि. कंपनीने कामाला सुरुवात केली. फक्त झोपडपट्टीच्या बाजूने संरक्षण भिंत उभारण्यात आली. त्यानंतर काम बंद पंडले. ते अजूनही ठप्प आहे.
तलावातील गाळ काढणे, संरक्षण भिंत उभारणे, तलाव खोलीकरण, उद्यानाच्या बाजूने पायऱ्यांचे बांधकाम, सौंदर्यीकरण अशा कामांचा यात समावेश होता. दोन वर्षात फक्त २५ टक्के काम झाले आहे. दीड वर्षापासून काम ठप्प आहे. पावसाळ्यापूर्वी तलावातील गाळ काढणे अपेक्षित होते. परंतु कंत्राटदाराने तो काढला नाही.
...
निधीसाठी शासनाला पत्र
सक्करदरा तलावाच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. जवळपास २५ टक्के काम झाले. परंतु निधीअभावी काम बंद पडले. शासनाकडून निधी प्राप्त व्हावा, यासाठी नगर विकास विभागाला पत्र पाठविण्यात आले. परंतु त्यानंतरही शासनाकडून निधी प्राप्त झाला नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
....
उद्यानाच्या बाजूच्या पायऱ्या खचल्या
नासुप्र उद्यानात फिरण्यासाठी येणाऱ्यांना बसण्यासाठी तलावाला पायऱ्या बांधल्या आहेत. परंतु गेल्या आठवड्यात पायऱ्या खचल्या. यामुळे उद्यानात फिरण्यासाठी येणाऱ्यांचा अपघात होण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात तलावात पाणी साचल्यानंतर या पायऱ्या पुन्हा खचण्याचा धोका आहे.
....
रहदारी बंद पडण्याची शक्यता
छोटा ताजबाग बाजूने तलावाची संरक्षण भिंत उभारण्याचे काम हाती घेतले होते. परंतु ते अर्धवट आहे. पावसाळ्यात तलावात पाणी साचल्यास या बाजूचा रस्ता खचून मोठी दुर्घटना होण्याची भीती असल्याने रस्त्यावर टिनाचे कठडे लावण्यात आले आहे. रस्ता खचल्यास या मार्गावरील वाहतूक ठप्प पडण्याचा धोका आहे.
....
बंद पडलेले काम तत्काळ सुरू करा
तलावाला संरक्षण भिंत उभारण्यापूर्वी तलावातील गाळ काढणे अपेक्षित होते. उन्हाळ्यात तलाव कोरडा पडला होता. परंतु तलावातील गाळ काढला नाही. याकडे प्रशासनाने लक्ष दिले नाही. पावसाळ्यात पाणी साचल्यानंतर गाळ काढणे शक्य होणार नाही. पावसाळ्यात रस्ता खचून अपघात होण्याचा धोका आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कामाला तत्काळ सुुरुवात करावी, अशी मागणी नगरसेवक सतीश होले यांनी केली आहे.