फेक कॉलमुळे सक्करदरा पोलिसांची दमछाक, परिसरात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2020 11:33 PM2020-05-01T23:33:06+5:302020-05-01T23:55:46+5:30
....पोलिसांसह साऱ्यांनीच सुटकेचा निश्वास टाकला.
नागपूर : मध्यप्रदेशातील काही व्यक्ती नागपुरात आल्या असून त्यांच्या हालचाली संशयास्पद असल्याचा कॉल पोलिसांना मिळाला. ही माहिती देणाऱ्या व्यक्तीने नंतर पोलिसांना प्रतिसाद देणे बंद केले. परिणामी पोलिसांची शुक्रवारी रात्री तब्बल दोन तास दमछाक झाली. संबंधित व्यक्तीचा शोध घेतल्यानंतर काहीही संशयास्पद नसल्याचे आणि फोन करणाऱ्याने व्यक्तिगत कारणामुळे खोडसाळपणा केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांसह साऱ्यांनीच सुटकेचा निश्वास टाकला.
सक्करदराचे ठाणेदार सत्यवान माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज शुक्रवारी रात्री ८ च्या सुमारास पोलीस ठाण्यातील एका हवालदाराच्या मोबाईलवर एकाने फोन केला. जुना सक्करदरा भागात काही व्यक्ती मध्यप्रदेशातून आल्या आहेत. त्यांच्या हालचाली एकूणच संशयास्पद असल्याचे या व्यक्तीने फोनवर सांगितले. हवालदार यांनी ही माहिती ठाणेदारांना दिली. त्यानंतर सक्करदरा पोलीस ठाण्यातील पथक फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊ लागले. त्याने नेमका पत्ता न दिल्यामुळे कोणत्या व्यक्ती कुठे आल्या, ते कळायला मार्ग नव्हता. त्यामुळे पोलिसांनी बरीच धावपळ करून फोन करणाऱ्या व्यक्तीला आधी शोधून काढले. त्यानंतर त्याने ज्या व्यक्तींबद्दल माहिती दिली होती, त्या व्यक्तीचे घर गाठले. नंतर ज्यांच्या बाबतीत माहिती होती. त्या कुटुंबातील व्यक्तींना आणि आजूबाजूच्यांना विचारणा करण्यात आली.
दरम्यानच्या चौकशीत फोन करणाऱ्या व्यक्तीने आपसी वैमनस्यामुळे संबंधित कुटुंबातील व्यक्तींना मनस्ताप देण्यासाठी हा खोडसाळपणा केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांची मात्र दोन तास दमछाक झाली आणि परिसरातही खळबळ निर्माण झाली होती. पोलिसांनी दिशाभूल करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेऊन समज देऊन नंतर त्याला सोडून दिले.
खोडसाळपणा करणाऱ्या व्यक्तीने फोनवर काहीही स्पष्ट सांगितले नव्हते. त्यामुळे पोलीसही संभ्रमात होते. सध्या कोरोनाचा धोका लक्षात घेऊन, तसेच काही असावे, असा अंदाज बांधून पोलिसांनी मेडिकलमध्ये सूचना देऊन आरोग्य पथकही मागवले होते. मात्र, त्याचे कामच पडले नाही.